ShivSena : 2 आमदार सोडले तर…; दसऱ्यानंतर ठाकरेंना दणका? शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा गौप्यस्फोट

MLA Kripal Tumane : येत्या काही दिवसांवर हिंदू समाजातील महत्वाचा मानला जाणारा दसरा हा सण येणार आहे. दसरा म्हटलं की शिवसेनेचा मेळावा; पण शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेचे दोन स्वंतत्र दसरा मेळावे होणार आहेत. या दसऱ्या मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र दिसणार असल्याच्याही चर्चा होत आहेत. अशातच आता दसरा मेळाव्यानंतर मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा शिंदेंच्या आमदाराने केल्याने गौप्यस्फोटामुळे होत आहे.
शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी दोन आमदार सोडले तर उर्वरीत सर्व आमदार आणि मुंबई महापालिकेतील जवळपास 80 टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामुळे दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही ठाकरेंना दणका देणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेमधील बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थांबणे पसंत केलं. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेवर महायुती सरकार विराजमान झालं. शिवाय विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांचे संख्यांबळ जास्त आहे. शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं सांगितलं जात आहे. अशातच एकनाथ शिंदेंचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुमाने यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार का? अशा चर्चा झडू लागल्या आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यावर उबाठा गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
राऊतांवर घणाघात
तुमाने यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेमुळे अनेक आमदार नाराज असल्याचं म्हटलं आहे. खासदार संजय राऊतांना सगळे कंटाळले असून राऊतांमुळे उबाठाचा सत्यानाश झाला आहे, अशी घणाघाती टीका तुमाने यांनी राऊतांवर केली आहे.
हेही वाचा : शेअर बाजाराची चांगली सुरुवात ! सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला ; ‘या’ शेअर्समध्ये वाढ





