ICC Test Rankings : बुमराह बनला कसोटीतील अव्वल गोलंदाज, ‘या’ गोलंदाजाची संपवली बादशाहत…

ICC Test Rankings : आयसीसीने बुधवारी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 870 गुणांसह रविचंद्रन अश्विनला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने बुमराहने क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराह यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये अव्वल स्थानी होता.
जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे जो नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आहे. बुमराहच्या आधी, कपिल देव कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय वेगवान गोलंदाज होता. डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1980 दरम्यान भारताचा माजी कर्णधार आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता.
तसेच क्रिकेटच्या इतिहासात तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावणारा दुसरा भारतीय क्रिकेटर ठरला आहे. बुमराह 2022 मध्ये वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये अव्वल होता. आता कसोटीतही नंबर 1 गोलंदाज म्हणून छाप पाडली आहे. आयसीसी क्रमवारीत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान यापूर्वी विराट कोहलीने पटकावलं आहे. टी20, वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वल स्थानी होता.
Say hello to ICC Men’s Number 1⃣ Test Bowler! 👋
Congratulations, Jasprit Bumrah! 👏👏@JaspritBumrah93 | #TeamIndia pic.twitter.com/DgTZi4eV26
— BCCI (@BCCI) October 2, 2024
बुमराहनं घेतल्या महत्त्वाच्या क्षणी विकेट्स…
बुमराहने कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि दोन्ही डावात मिळून 67 धावा देताना 6 बळी घेतले. त्याने सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेतल्या, जेव्हा त्याच्या संघाला त्याची गरज होती. बुमराह यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 2024 च्या सुरुवातीपासून बुमराहने 14.42 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत 38 विकेट घेतल्या आहेत.
आर अश्विननेही केली चमकदार कामगिरी…
आर अश्विननेही बांगलादेशविरुद्ध गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेत या फिरकीपटूने 11 बळी घेतले आणि शतकही झळकावले. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विन अव्वल स्थानी होता. कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विन बुमराहपेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे आणि येत्या काही महिन्यांत तो वेगवान गोलंदाजाला कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा आहे. कारण भारताला आता न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.
IND vs BAN : भारताच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ..! जाणून घ्या, पॉइंट टेबलची स्थिती…
क्रमवारीत इतर गोलंदाजांची स्थिती काय?
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अश्विन (869 गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (847 गुण) तिसऱ्या, पॅट कमिन्स (820 गुण) चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (820 गुण) पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे आणि तो क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठून सातवे स्थान पटकावले. त्याने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध 18 विकेट घेत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार पटकावला. टाॅप-10 यादीत पाकिस्तानच्या फक्त एका गोलंदाजाचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी 709 रेटिंग गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.





