WTC Points Table Update : कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतील समीकरणे बदललेली दिसत आहेत. भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला आहे. जवळपास 3 दिवस पावसाचा फटका बसल्यानंतर भारताने आक्रमक खेळ दाखवत दुसरा कसोटी सामना 7 विकेटने जिंकला. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्याने टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियावर चांगली आघाडी घेतली आहे आणि आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केलं आहे.
WTC गुणतालिका…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप तक्ता गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केला जातो. भारत सध्या 74.24 टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या क्लीन स्वीपमुळे टीम इंडिया सलग तिसरी फायनल खेळणार असल्याच्या आशा वाढल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे, ज्याची गुणांची टक्केवारी 62.50 आहे आणि तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे, ज्याने अलीकडेच कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला आहे. श्रीलंकेची टक्केवारी 55.56 आहे. इंग्लंड चौथ्या ,दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी तर न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहेत. पाकिस्तान आठव्या तर वेस्टइंडिज शेवटच्या म्हणजेच नवव्या स्थानी आहे.
दुसरीकडे, विश्वकसोटी क्रमवारीत, मालिकेच्या सुरुवातीला भारत अग्रस्थानी तर बांगलादेश पाचव्या स्थानी होता. ही मालिका भारताने 2-0 अशी जिंकल्याने भारताचे अग्रस्थान कायम असले बांगलादेश मात्र थेट सातव्या स्थानी फेकला गेला आहे. त्यांची विजयी टक्केवीरी 39.29 वरून 34.37 इतकी झाली आहे.
विश्वकसोटीच्या या हंगामात भारताने 11 कसोटी सामन्यांमध्ये 8 विजय, 2 पराभव व 1 बरोबरी साधली आहे. बांगलादेश संघाने पाकिस्तानला पराभूत करताना सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली होती. मात्र, भारताविरुद्धच्या पराभवाने ते पुन्हा सातव्या स्थानी गेले आहेत. बांगलादेश संघाने हा हंगामात 8 कसोटी सामन्यांमध्ये 3 विजय तर 5 पराभव स्वीकारले आहेत.
भारताचे पुढील सामने…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशचा 2-0 ने पराभव केल्यानंतर भारत आता न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 3 कसोटी सामन्यांची मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.