Champions Trophy 2025 : ‘हायब्रीड मॉडेल’साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार, पण ICC पुढे ठेवली एक नवीन अट…

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत हायब्रीड मॉडेल व्दारे स्पर्धा होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. आता मिडिया रिपोर्टनुसार अशी माहिती समोर येत आहे की, “पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलसाठी एक अट समोर ठेवली आहे.”
एका सूत्राने आयएएनएस वृत्तसंस्थेला सांगितले की, “भविष्यात भारतात होणाऱ्या सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये हायब्रिड मॉडेलचाच वापर केला जाईल” असे पाकिस्तानने आयसीसीकडे लेखी आश्वासन मागितले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. वृत्तानुसार, टीम इंडिया ही स्पर्धा दुबईत खेळणार आहे. जर टीम इंडिया पात्र ठरली तर सेमीफायनल आणि फायनल सामनेही दुबईत खेळवले जातील.
वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्राने सांगितले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) जागतिक संस्थेकडून (ICC) भविष्यात भारतात आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलबाबत लेखी आश्वासन हवे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बुधवारपर्यंत निर्णय येण्याची अपेक्षा आहे. ”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 09 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने नकार दिल्यानंतर या स्पर्धेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. आता या स्पर्धेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हायब्रीड माॅडल अंतर्गत झाला होता आशिया कप….
साल 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकाचे यजमानपदही पाकिस्तानकडेच होते हे विशेष. त्यावेळीही भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर, हायब्रीड मॉडेल अंतर्गत, टीम इंडियाने आशिया कपचे सामने श्रीलंकेच्या यजमानाखाली खेळले होते.





