IAS Vikram Virkar: बिहारमध्ये मराठी डंका! मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याची कमान सोपवली माणदेशच्या सुपुत्राकडे
IAS Vikram Virkar: मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या शपथविधीनंतर पहिलाच मोठा प्रशासकीय फेरबदल; आपल्या कर्मभूमीची जबाबदारी मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर.

IAS Vikram Virkar – कल्पक, नावीन्यपूर्ण आणि कार्यतत्पर अशा धडाकेबाज प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे माणदेशाचे सुपुत्र आणि आयएएस विक्रम वीरकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बिहार राज्याचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची कर्मभूमी असलेल्या ‘खगडिया’ जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विक्रम वीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम वीरकर यांनी बिहार राज्याच्या ‘प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक’ म्हणून गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी भूमिका बजावली.
या कार्यकाळात त्यांनी बिहारच्या शैक्षणिक धोरणांमध्ये आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम धडाडीने राबवले. पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीतून त्यांनी बिहार राज्याला एका अत्यंत वेगळ्या आणि आश्वासक प्रशासकीय नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. त्यांच्या याच कार्याची आणि अफाट क्षमतेची विशेष दखल घेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्याच प्रशासकीय फेरबदलात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपल्या हक्काचा आणि कर्मभूमीचा जिल्हा या तरुण, तडफदार मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या खंबीर हाती सोपवला आहे.
माणदेशातून शुभेच्छांचा वर्षाव
आयएएस विक्रम वीरकर यांच्या या यशाबद्दल आणि नियुक्तीबद्दल माणदेशातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘विक्रम वीरकर यांच्या या यशामुळे माणदेशाची आणि पर्यायाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रशासकीय सेवेत ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचोत आणि त्यांच्या हातून असेच लोकाभिमुख व कल्याणकारी कार्य अविरत घडो,’” अशी भावना माणदेशातील सर्व स्तरांतील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आपल्या सुपुत्राच्या या प्रगतीमुळे माणदेशात सध्या सर्वत्र प्रेरक उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




