Ias officer : मोठा यू-टर्न..! राज्यातील ‘या’ बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, काय आहे प्रकरण?
Ias officer : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव असलेले एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.

Ias officer : राज्यातील बड्या आयएएस ( IAS Officer )अधिकाऱ्याच्या निलंबनाबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव असलेले एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली होती. या वेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, चंद्रपूरमधील प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकींना वारंवार अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे आदेश देऊनही बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाकडूनही या कारवाईसंदर्भात आदेश जारी करण्यात आले होते.
मात्र निलंबनानंतर एम. देवेंद्र सिंग यांनी संबंधित कागदपत्रे सादर करत दिलगिरी व्यक्त केली. याबाबत विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचे आदेश रद्द करण्यात येत आहेत.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अध्यक्षांच्या निर्देशानुसार निलंबन मागे घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. एम. देवेंद्र सिंग हे २०११ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती आणि त्यानुसार निलंबनाचे आदेश काढण्यात आले होते. मात्र आता दिलगिरीनंतर ते आदेश मागे घेण्यात आले आहेत.




