“…..तोपर्यंत गप्प बसणार नाही”; रवींद्र धगेंकरांचं समीर पाटलांना थेट खुलं आव्हान, पत्रकार परिषदेतून कोणता मोठा गौप्यस्फोट करणार?

Ravindra Dhangekar : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावर महायुतीमधील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या प्रकरणावर धंगेकर यांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर पाटील यांनी धंगेकरांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत त्यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणावर पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हा समीर पाटील प्लॅनर आहे. शहरातील पबपासून ते ड्रग्सपर्यंतचे अर्थकारण समोर येईल, असा मोठा दावा धंगेकरांनी केला आहे. या प्रकरणात जोपर्यंत निलेश घायवळ सापडत नाही आणि समीर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका रवींद्र धंगेकर यांनी घेतली आहे. यामुळे आता महायुतीची अडचण वाढली आहे.
समीर पाटील हा त्यांचा पीए नव्हता, तर दुसरंच काही तरी निघाला. त्याला मी उत्तर देणारच आहे. माझ्यावर मोक्का लावणार असे समीर पाटील म्हणाला. मी त्याला तयार आहे, अशी प्रतिक्रिया देत धंगेकरांनी समीर पाटील यांनी थेट खुल आव्हानचं दिले आहे.
सध्या दिवाळी असल्याने कोर्टाला सुट्या आहेत. वकील मंडळीना सुट्या आहेत. दिवाळी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करु. समीर पाटलांचा विषय सुटण्यासारखाच नाही. निलेश घायवळ अद्याप सापडत नाही. यामध्ये पोलिसांचे मोठे अपयश आह, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे. मी आवाज नसता उठवला तर हे गुन्हे दाखल झाले नसते, असेही धंगेकर म्हणाले.
कोणता मोठा गौप्यस्फोट करणार?
या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनामध्ये वादाची दरी निर्माण झाली आहे. या प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात त्यांची आक्रमक भूमिका कायम आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना महायुतीत दंगा नको, असा सल्ला दिला होता. मात्र, धंगेकर या प्रकरणावर सातत्याने आरोप करत आहेत. आज पुन्हा एकदा ते पत्रकार परिषद घेणार असून, या पत्रकार परिषदेतून ते कोणावर आरोप करतात तसेच कोणता मोठा गौप्यस्फोट करतात याकडे पुणेकरांचे लागलेले आहे.





