Devendra Fadnavis : “डॉ. संपदा मुंडेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” – देवेंद्र फडवणीस

Dr. Sampada Munde | Devendra Fadnavis – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांची नावे गोवण्याचा अतिशय निंदनीय प्रयत्न झाला. संपूर्णपणे महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. जर यात तिळमात्रही शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करून येथे आलो नसतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फलटण येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जर कोणीतरी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला उत्तर देणारा मी आहे. मी याठिकाणी येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. परवा आमची बहीण डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली.
त्यांनी आत्महत्या करताना त्यांच्या आत्महत्येचे कारण आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ त्या आरोपींना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर त्या घटनेतील सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत या भगिनीला न्याय मिळवून देणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डॉक्टर भगिनीच्या आत्महत्या प्रकरणात रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात मला थोडी जरी शंका असती तर हा कार्यक्रम रद्द करुन येथे आलो नसतो. अशा बाबतीमध्ये मी पक्ष, व्यक्ती, राजकारण पाहात नाही, जिथे माझ्या भगिनीचा विषय आहे, तिथे मी कॉम्परमाईज करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.





