Rajabhau Waje : “मी ठाकरेंची साथ सोडणार नाही. त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती,”; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचे विधान
Rajabhau Waje : पक्षातील संभाव्य खासदारांच्या फुटीची चर्चा आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Rajabhau Waje : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सात खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. अधून मधून या चर्चा सुरूच असतात. या सगळ्यात आता उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे.
१४ जूनला ‘मातोश्री’वर पक्षाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राज्यातील राजकारण तापलेले असतानाच या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील संभाव्य खासदारांच्या फुटीची चर्चा आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
माध्यमांमध्ये अॅापरेशन टायगरद्वारे ठाकरेंच्या खासदारांना एकनाथ शिंदेंकडून फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी रणनिती आखल्याचे देखील बोलले जात आहे. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नाशिकच्या खासदाराने रोखठोक प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा : Rajnath singh: ‘दहशतवादाच्या सूत्रधारांना सिंधू नदीचे पाणी मिळणार नाही’ ; राजनाथ सिंह यांचा पाकला थेट इशारा
काय म्हणाले राजाभाऊ वाजे? (Rajabhau Waje)
एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना “मी त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती. पण हे कलियुग आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि कुठेही जाणार नाही,” असे विधान करत त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बैठकीबाबत बोलताना वाजे म्हणाले, “मला बैठकीचा निरोप मिळाला आहे आणि मी बैठकीला उपस्थित राहणार आहे. मात्र, ही बैठक ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आली आहे, असे मला वाटत नाही. ही पक्षाची नियमित बैठक आहे.”
शिंदे गटाच्या संपर्कात ठाकरे गटातील काही खासदार असल्याच्या चर्चांमध्ये स्वतःचे नाव घेतले जात असल्याबाबत विचारले असता वाजे यांनी “माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. माझ्यापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही. त्यामुळे पक्षांतराचा प्रश्नच निर्माण होत नाही. मी शिवसेनेमुळे आमदार झालो, शिवसेनेमुळेच खासदार झालो. त्यामुळे उद्धव साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे,” अशा स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
दानवेंच्या विधानची चर्चा (Rajabhau Waje)
मराठवाडा येथे उबाठा गटाच्या खासदारांच्या बैठकीत शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. “लोकसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष झाले आहेत. या दोन वर्षात अशी चर्चा आहे. शिवाय महिन्याला, दर दोन महिन्याला अशी चर्चा होतच असते. काही खासदार एकनाथ शिंदेयांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहित आहे. मात्र दर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते आता हे अधिकृत कबूल करायला हवं”, असे विधान अंबादास दानवे यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.






