“भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आपल्यासोबत…”; अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांचे विधान

Nashik Lok Sabha Election| नाशिक लोकसभा मतदारसंघात राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे सोमवारी भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज येथे प्रचाराचा शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांकडूनही नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
वेरुळचे मठाधिपती शांतीगिरी महाराजांच मोठा वर्ग नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आहे. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराचे दीड ते दोन लाख अनुयायी आहेत. शांतीगिरी महाराज अपक्ष लढत असल्याचा फटका महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना बसू शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराजांनी माघारी घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही.
हिंदुत्त्ववादी संघटनांचा पाठिंबा
यातच आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे असताना भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आपल्यासोबत आहेत, मला सगळ्याच हिंदुत्त्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे. भाजप देखील माझ्या पाठिशी उभी आहे, यात शंका नाही, असे शांतीगिरी महाराजांनी म्हटले आहे.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाहेरून रॅली जात असताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी गोडसेंच्या प्रचार रथावर फुलांचा वर्षाव केला. त्या रथावरील नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पुष्पहारदेखील घातला. यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराकडून स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. Nashik Lok Sabha Election|
अनोख्या प्रचारामुळे शांतीगिरी महाराज चर्चेत
अलीकडेच शांतीगिरी महाराजांनी सायकलवरून प्रवास करत नाशिकमध्ये प्रचार केला होता. पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर बसून प्रचार केला. यामुळे देखील ते चांगलेच चर्चेत आले होते.
दरम्यान, नाशिकमध्ये २०१४ पासून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. यंदा त्यांना उमेदवारी देण्यात महायुतीमधील मित्रपक्षांनी विरोध केला. तसेच महायुतीकडून नाशिकसाठी छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. अखेर येथून शेवटच्या क्षणाला हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. Nashik Lok Sabha Election|
हेही वाचा:
स्वाती मालीवाल प्रकरण : दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला घेतले ताब्यात




