Chhagan Bhujbal : “नाशिकसाठी जे करायचे ते मी करेल, या वादात मला पडायचं नाही” – छगन भुजबळ

Nashik | Chhagan Bhujbal – ‘नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी मी कुठेही आग्रह धरलेला नाही, मला या वादात पडायचं नाही, मी खूप इच्छुक आहे असं नाही. नाशिकसाठी जे करायचे ते मी करत राहील’, असे सूचक वक्तव्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी करताना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनच वाढवला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीचे राजकारण केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही.
त्यांनी सर्वच जातीच्या लोकांना न्याय दिला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आणले, महापौर केले. भविष्यात उद्धव आणि राज हे एकत्र आले तरी निश्चित बळ वाढेल, परंतू ते किती वाढेल याचा माझा अभ्यास नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
मी उद्धवसेना नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षात कोण निर्णय घेते याची मला कल्पना नाही. मी होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः निर्णय घेत. एकदा पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा शिवसेनेत जाण्याचा माझा मुद्दाच नव्हता. मी तसा प्रयत्नही केला नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
भुजबळ फार्म येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेत जे घडले त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी असली तरी आर्थिक निर्णय हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.





