Uddhav Thackeray : मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर…; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

पुणे : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांना ‘पगारी मतदार’ बनवण्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आज बऱ्याच दिवसांनंतर मी पुण्यात आलो आहे. पण आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन… नाहीतर मी नेहमी येईन पुण्यात! असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हा मेळावा निवडणुकीच्या तयारीसाठी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सरकारला घेराव
ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारला कठोर शब्दांत चांगलेच झोडपले. ते म्हणाले, तुमच्यासारख्या माता-भगिनी ज्यांचा कुणी वाली नाही, अशा महिलांसाठी ही योजना असावी. पण सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून जातात. हे कुठे पळणार? शेतकरी आत्महत्या करत आहेत, तो कुठे पळणार?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत ते पुढे म्हणाले, आपण सर्वसामान्य प्रामाणिक आहोत. बँकेची नोटीस आली की शेतकरी म्हणतो, ‘गावात बदनामी होईल म्हणून जीव देऊन टाळावे.’ हा शेतकरी देश सोडत नाही, तर देह सोडतो. हा फरक आहे. नंतर सरकारच्या मनात येतं आणि श्रीमंतांच्या करोडो कर्ज माफ होतात. पण गोरगरिबांचे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
लाडकी बहीण योजनेत ‘फसवणुकीचा’ आरोप
लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंनी भाजपला ‘पगारी मतदार’ तयार करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, सत्ता असणाऱ्यांनी लाडक्या बहिणींना लाभ दिले. निवडणुकीआधी खात्यात पैसे आले, मग फोन येतो. ‘तुमचं खातं आहे ना? पैसे आले ना?’ बहिणींना वाटतं, ‘माझं नाव या माणसाला माहिती, तर मत नाही दिलं तर काय होईल?’ पण आता ते तुम्हाला फसवत आहेत.
योजनेच्या बजेटमध्ये १०,००० कोटी रुपयांची कपात झाल्याचा उल्लेख करत ठाकरेंनी म्हटले, २१०० रुपयांची वाढ कधी देणार? आता ६ महिन्यांचे हप्ते एकदम द्या, कारण बहिणींना गरज आहे. निवडणुका आल्या म्हणून काहीतरी जाहीर होईल. बिहारच्या उदाहरणाचा दाखला देत ते म्हणाले, बिहार निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, तरी नरेंद्र मोदींनी महिलांच्या खात्यात १० हजार टाकले. महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.





