जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांवर लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभाची कारवाई

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत. अलीकडेच, राज्यातील तब्बल 26 लाख महिलांची गृहचौकशी होणार असल्याचे समोर आले होते. आता आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्यातील 1183 जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
नियमांचे उल्लंघन, कारवाईचे आदेश
लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, यापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याची यादी महिला व बालविकास विभागाने तयार केली आहे. या यादीत 26 लाख महिलांचा समावेश असून, त्यांची विभागनिहाय चौकशी सुरू झाली आहे. यातच, जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने शासनाला अहवाल सादर केला असून, सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) या बोगस लाभार्थ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लाखो महिलांना योजनेतून वगळण्याची शक्यता
सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, छाननीनंतर एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच लाभ मिळण्याचा निकष लागू झाल्यास लाखो महिला योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे. यात आता जिल्हा परिषद कर्मचारी महिलांचाही समावेश होणार आहे. योजनेच्या नियमानुसार, लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळतात.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
यापूर्वी, निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणाऱ्या सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता छाननीच्या नावाखाली लाखो महिलांना योजनेतून वगळण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, बोगस माहिती देऊन लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी महिलांवर होणारी कारवाई आणि योजनेची पुढील दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजनेच्या नियमांचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याने येत्या काळात याबाबत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.





