मी संघाचा स्वयंसेवक होतो…; निरोप समारंभात निवृत्त न्यायाधीशांची स्पष्टोक्ती

कोलकता – कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास सोमवारी सेवानिवृत्त झाले. मी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएसएस) स्वयंसेवक होतो, अशी स्पष्टोक्ती त्यांनी निरोप समारंभात केली. तसेच, त्या संघटनेने पाचारण केले तर पुन्हा कार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
ओडिशात जन्मलेले दास न्यायाधीश म्हणून सुमारे १४ वर्षे कार्यरत होते. ओडिशा उच्च न्यायालयात ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांना अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. न्यायाधीश म्हणून कलकत्ता उच्च न्यायालयात जून २०२२ मध्ये त्यांची बदली झाली.
सेवानिवृत्त झाल्याने त्यांना न्यायाधीश आणि वकिलांनी विशेष समारंभात निरोप दिला. त्यावेळी दास यांनी संघाशी असणारे नाते नमूद केले. लहानपणापासून युवादशेत असेपर्यंत मी संघाशी जोडला गेलो होतो.
त्या संघटनेचा मी खूप ऋणी आहे. धाडसीपणा, प्रामाणिकपणा मी त्या संघटनेकडून शिकलो. देशभक्ती, कार्याप्रती वचनबद्धता, सर्वांशी समान भाव याबाबीही संघाने माझ्यावर बिंबवल्या.





