“मी संसदेत शपथ घेतलीय, आयोगाने मला फक्त…” ; बेंगळुरूच्या रॅलीत राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Rahul Gandhi in Bengaluru। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. बेंगळुरूमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, “निवडणुकीत मतांची चोरी हा संविधानाशी विश्वासघात आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत संविधान वाचवायचे आहे” असे म्हणत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
बेंगळुरूमधील फ्रीडम पार्क याठिकाणी आयोजित मतदान अधिकार रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी, “संविधान प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देते. पण आता देशातील संस्था नष्ट केल्या जात आहेत. संविधानाशी छेडछाड केली जात आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेत्यांनी संविधानावर हल्ला केला. भारतातील संस्था नष्ट करून संविधानावर हल्ला करण्यात आला.” असे म्हणत केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
पुढे ते म्हणाले की, “कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभेत ६.५० लाख मते आहेत पण त्यापैकी सुमारे एक लाख मते चोरीला गेली आहेत. चोरी पाच प्रकारे झाली. डुप्लिकेट मतदार म्हणजे एका मतदाराने अनेक वेळा मतदान केले. एका मतदाराने ५-६ मतदान केंद्रांवर मतदान केले. असे सुमारे ४० हजार लोक आहेत ज्यांचा पत्ताही नव्हता. एका पत्त्यावर ४०-४० मतदार आहेत.
निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो… Rahul Gandhi in Bengaluru।
राहुल गांधी यांनी रॅलीत सांगितले की,” निवडणूक आयोग मला शपथपत्र मागत आहे. मी संसदेत संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आज जेव्हा भारतातील लोक आमच्या डेटाबद्दल आयोगाला प्रश्न विचारत आहेत, तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली आहे कारण त्यांना माहित आहे की जर भारतातील लोक या डेटाबद्दल प्रश्न विचारू लागले तर त्याचे पितळ उघडे होईल”
त्यासोबतच त्यांनी,”आमची मागणी अशी आहे की आयोगाने आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावी. काल मी सिद्ध केले की देशात मतांची चोरी झाली आहे. जर निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी देईल, तर आम्ही सिद्ध करू की भारताचे पंतप्रधान मते चोरून पंतप्रधान झाले आहेत.” असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा चोरीला गेली Rahul Gandhi in Bengaluru।
त्यासोबतच त्यांनी या कार्यक्रमात, जर निवडणूक आयोग आम्हाला डेटा देत नसेल, तर आम्ही हे काम फक्त एका जागीच नाही तर १०, २० किंवा २५ जागांवरही करू शकतो. आमच्याकडे कागदी प्रती आहेत. तुम्ही लपू शकत नाही. एक मतदार अनेक वेळा मतदान करत आहे. एक ना एक दिवस तुम्हाला विरोधाला सामोरे जावे लागेल. प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याने हे चांगले समजून घेतले पाहिजे. याठिकाणी अख्खी एक लोकसभा चोरीला गेली आहे. हे कर्नाटकच्या लोकांविरुद्धचे गुन्हेगारी कृत्य आहे. कर्नाटक सरकारने या गुन्ह्याची चौकशी करून कारवाई करावी. मतदार यादीत १५००० बनावट लोक टाकणाऱ्या या आयोगाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे.” अशी मागणी देखील त्यांनी केली. राहुल म्हणाले की, “तुम्हाला आठवत असेल की कर्नाटक सरकार चोरीला गेले होते. पैसे देऊन चोरीला गेले होते. मी तुम्हाला १०० टक्के पुराव्यासह सांगत आहे की लोकसभा देखील चोरीला गेली आहे. भाजपची विचारसरणी संविधानाच्या विरुद्ध आहे. परंतु काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता संविधानाचे रक्षण करेल.”
दरम्यन , काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मते चोरल्याचा आरोप केला होता. त्यांनी,” कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० बनावट मते तयार करण्यात आली, ज्याचा भाजपला फायदा झाला” असा आरोप केला होता.





