Eknath Shinde : मला याआधीही अनेकवेळा धमक्या आल्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/ नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लॉ अँड ऑर्डरचे सहआयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी या धमकीबाबत माहिती दिली. मला अनेकवेळा अशा धमक्या आलेल्या आहेत. पण मी असल्या धमक्यांचा कधी विचार केला नाही. मी माझे काम करत राहिलो आणि आताही काम सुरू राहणार आहे.
शिंदेंनी दिल्ली येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आजचा दिवस एनडीए आणि दिल्लीसाठी ऐतिहासिक आहे. 27 वर्षांनंतर दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदींचा भगवा झेंडा फडकला आहे. रेखा गुप्ता ही लाडकी बहीण मुख्यमंत्री झाल्या.
त्यामुळे आता दिल्लीत होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच थांबलेला विकास असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालना मिळेल. विकासाला चालना मिळेल. महाराष्ट्रात जसे डबल इंजिन सरकार काम करत आहे, तसेच दिल्लीच्या विकासासाठीही मोदींच्या मार्गदर्शनाखाली रेखा गुप्ता चालना देतील, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल
मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना अनेक जहाल नक्षलवाद्यांचा पोलिसांनी बिमोड केला. अनेक मोठे नक्षलवादी मारले गेले. माझ्या पालकमंत्री पदाच्या कारकीर्दीत गडचिरोलीत सर्वात आधी सुरजागडचा प्रकल्प सुरू करण्यात आला. आता तिथे मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस देखील स्वतः लक्ष घालत आहेत. अनेक एमओयू झालेले आहेत. त्यामुळे गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात गडचिरोली जिल्हा येईल, असेही ते म्हणाले.





