“मार्क मिळाले १००, कमळी आमची एक नंबर…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

Uddhav Thackeray | इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी सक्तीला मनसे आणि उद्धव ठाकरे गटाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. यातच 5 जुलैला ठाकरे बंधुंनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र त्यापूर्वी त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय रद्द केले. अनेकांकडून प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने शासन निर्णय रद्द करत नवीन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा पुन्हा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना, शिवसैनिक तर आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या-ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण, भविष्यातही अशा पद्धतीची हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“येत्या पाच तारखेला विजय मेळावा होईल. हा मेळावा कुठे होईल दोन दिवसात जाहीर होईल. आपण आता एकजूट झालो आहोत. सरकारला शहाणपण सुचले आहे की नाही, हे येत्या काही दिवसात कळेल; पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. त्यांनी जर रद्द केला नसता, तर ५ तारखेच्या मोर्च्यात भाजप, शिंदे गटातील, अजित पवार गटातील अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते, आणि होणार आहेत. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतो. मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असले पाहिजे”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“सरकारने आता एक नवीन समिती नेमली आहे. त्या समितीत नरेंद्र जाधव यांचा समावेश आहे. हा शिक्षणाच्या भाषेचा विषय आहे. सरकारनं आता तरी थट्टा करू नये. तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमली आहे. समिती कोणतीही असू दे. आता सक्तीचा विषय संपलेला आहे. महाराष्ट्रावर कोणतीही सक्ती होऊ शकत नाही. हे मराठी माणसाच्या शक्तीनं दाखवून दिलं आहे.”
….तिथेही ईव्हीएम मशीनचा वापर केला का?
“पहिले मराठी विरुद्ध अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. हे सरकारचं षडयंत्र आहे. मराठी माणसात वाद होत नाही. हे दिसल्यानंतर मराठी एकजूट होऊ नये, म्हणून त्यांनी हा जीआर मागे घेतला आहे. मार्क मिळाले १०० पैकी १०० कमळी आमची एक नंबर… ही कमळी कोणत्या शाळेत शिकली हे बघायला हवं. कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती, हे देखील पाहायला हवं की तिथेही ईव्हीएम मशीनचा वापर केला? हे पाहायला हवं, ” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली केली आहे.
दरम्यान, त्रिभाषा सुत्राचा शासन निर्णय मागे घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान जाहीर केलं. त्यामुळे पाच जुलै रोजी होणारा सर्वपक्षीय मोर्चा टाळला आहे, मात्र पाच जुलै रोजी विजय रॅली निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विजयी मेळावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. Uddhav Thackeray |
हेही वाचा:





