Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना ‘दे धक्का’

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (एमव्हीए) राज्यात चांगले यश मिळवले होते, तर महायुतीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन करत 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले. आता विधानसभेतील या मोठ्या पराभवानंतर महाविकास आघाडीला पक्षांतर्गत गळतीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, कारण अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
विलेपार्लेतील ३०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व येथे आयोजित एका कार्यक्रमात कुणाल सलमळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ही पक्षगळती ठाकरे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरली असून, याला आळा घालणे हे पक्षासमोरील प्रमुख आव्हान आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला झटका
आगामी काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चुरस तीव्र असताना, ठाकरे गटातील ३०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.





