Prime Minister Narendra Modi : “महिलांवर होणारे अत्याचार पाहून मला खूप दुःख होतंय अन्….; PM मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. मोंदींनी दुर्गापूर येथील रॅलीदरम्यान पश्चिम बंगाल राज्यातील महिलांवरील अत्याचार दंगली आणि पोलिसांच्या पक्षपाती करवायांचा हे मुद्दे उपस्थित करत त्यावरून ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदींनी त्यांच्या भाषणातून अराजकता पसरवण्याचा गंभीर आरोप ममता सरकारवर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक का होईल, जिथं दंगल होते आणि पोलिस पक्षपाती असतात? असा प्रश्न उपस्थित करत मोदींनी टीएमसीच्या ‘गुंडा कर’ संस्कृतीवर जोरदार निशाणा साधला. तसेच अशा वातावरणामुळे गुंतवणूकदार राज्यापासून दूर राहतात आणि विकासाचा मार्ग खुंटतो, असे देखील म्हटले आहे.
या रॅलीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानांनी अतिशय पद्धतशीरपणे स्पष्ट केले की जर बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले तर राज्य स्वातंत्र्यपूर्व वैभव आणि गमावलेली ओळख कशी परत मिळवेल. यावेळी बोलताना त्यांनी योजनांची यादी सादर केली आणि जनतेला विकासाचे आश्वासन दिले. पश्चिम बंगालची जनता आता परिवर्तनाची आस धरून भारतीय जनता पक्षाकडे पाहत आहे, असे म्हणत टीएमसी सरकारच्या ‘लोकविरोधी’ धोरणांची खिल्ली उडवली.
‘विकास, स्थिरता आणि पारदर्शक प्रशासन केवळ भाजपच देऊ शकतो, असे विधान यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये नागरिकांना दिले आहे. राज्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होणारे अत्याचार पाहून मला खूप दुःख होतंय आणि रागही येतोय, असं मोदींनी स्पष्टपणे सांगितलं.
‘जय माँ दुर्गा’ या जयघोषाने भाषणाची सुरूवात
दुर्गापूरच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय माँ काली’ आणि ‘जय माँ दुर्गा’ या जयघोषाने भाषणाची सुरूवात केली. त्यांनी अशा प्रकारे बंगालच्या सांस्कृतिक भावनेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर त्यांनी ‘जय भोलेनाथ’ ने त्यांनी हे देखील दाखवून दिले की ‘जय श्री राम’ ऐवजी भाजप आता ‘बंगाली भावनां’च्या जवळ जाऊ इच्छित आहे.





