ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भेटीसाठी अर्जेंटिनामध्ये दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान ते देशाच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करतील आणि चालू सहकार्याचा आढावा घेतील. भारत आणि अर्जेंटिना दरम्यान महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी कशी वाढवायची यावर ही चर्चा केंद्रीत असणार आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दोन दिवसांचा दौरा संपवल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ते अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एझीझा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. गेल्या ५७ वर्षांत पंतप्रधान स्तरावरील हा पहिलाच भारतीय द्विपक्षीय अर्जेंटिना दौरा आहे. पंतप्रधान म्हणून मोदींचा अर्जेंटिनाचा हा दुसरा दौरा आहे. त्यांनी २०१८ मध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनाला भेट दिली होती. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यानचा हा त्यांचा तिसरा देश आहे.
आपल्या दौऱ्यादरम्यान संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू, अक्षय ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत-अर्जेंटिना भागीदारी आणखी वाढवण्यासाठी मोदी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांच्याशी विस्तृत चर्चा करतील. पंतप्रधानांच्या द्विपक्षीय भेटीमुळे भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील बहुआयामी धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात, मोदी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जातील आणि त्यानंतर त्यांचा अधिकृत सरकारी दौरा होईल. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, मोदी नामिबियाला जाणार आहेत.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत मोदींचे स्वागत
अर्जेंटिनामधील भारतीय वंशाच्या स्थानिक नागरिकांन सांस्कृतिक वेशभुषेमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. शुक्रवारी रात्री भारतीय समुदायाच्या सदस्यांनी मोदी-मोदी, जय हिंद आणि भारत माता की जय च्या उत्साही घोषणांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. उत्साही स्वागत समारंभात पारंपारिक भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले. भारतीय वंशाच्या नृत्यांगनांनी ओडिसी नृत्यप्रकार सादर केला आणि ऑपरेशन सिंदूरला समर्पित एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या नृत्याविष्कारामध्ये भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अर्जेंटिनामध्ये राष्ट्रीय नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनरल जोस डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. जोस फ्रान्सिस्को डी सॅन मार्टिन वाय मॅटोरस हे अर्जेंटिना, चिली आणि पेरू या दक्षिण अमेरिकन राष्ट्रांचे मुक्तिदाता म्हणूनही ओळखले जातात.