Vivek Oberoi: “मी अभिनेता आहे, नेता नाही”; सोनम वांगचुकांवरील प्रश्नावर विवेक ओबेरॉयंची भूमिका
Vivek Oberoi सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Vivek Oberoi: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या वांगचुक यांच्या आंदोलनावर मत विचारले असता, “मी अभिनेता आहे, नेता नाही. त्यामुळे राजकीय विषयांवर भाष्य करत नाही,” असे विवेक यांनी स्पष्ट सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्यावर टीका केली.
सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांसाठी ते सातत्याने आंदोलन करत असून, अनेक सामाजिक आणि राजकीय व्यक्तींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर विवेक ओबेरॉय यांना माध्यमांनी वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, “मी अभिनेता आहे, नेता नाही. त्यामुळे राजकीय विषयांवर भाष्य करत नाही. आम्ही निरीक्षण करतो, शिकतो. आयुष्यात दररोज अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात,” असे उत्तर दिले.
मात्र त्यानंतर त्यांना आंदोलनातून नेमके काय शिकायला मिळाले, असा पूरक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विवेक म्हणाले, “हे आंदोलनही माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. निरोगी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. लोकांनी आपला आवाज व्यक्त केला, हीच लोकशाहीची ताकद आहे.”

Sonam Wangchuk
विवेक यांनी आंदोलनाला थेट पाठिंबा दिला नाही किंवा त्याविरोधातही भूमिका घेतली नाही. त्यांनी केवळ लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या संयमी भूमिकेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
एका युजरने, “अभिनेता म्हणूनच नाही, तर नागरिक म्हणूनही भूमिका घ्यायला हवी. देशासाठी चांगल्या गोष्टींसाठी कोण बोलणार?” असा सवाल केला. तर दुसऱ्या एका युजरने, “मी अभिनेता आहे, पण ठाम भूमिका घेण्याचे धाडस नाही,” अशा शब्दांत टीका केली. काहींनी विवेक यांच्यावर सरकारची बाजू घेत असल्याचा आरोपही केला.
दुसरीकडे, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक चित्रपट कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. अभिनेता प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, अभय देओल, अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, सोनाक्षी सिन्हा, ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ओमी वैद्य, गायक विशाल ददलानी, झीनत अमान, कुनिका सदानंद आणि देवोलीना भट्टाचार्जी यांसारख्या कलाकारांनी वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत समर्थन व्यक्त केले आहे. काहींनी त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारखे अनेक मोठे कलाकार अद्याप शांत असल्याची चर्चा देखील रंगत आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनीही यावर प्रश्न उपस्थित करत, “चित्रपटातील ‘रँचो’ सर्वांना आवडतो, पण खऱ्या आयुष्यातील रँचोसाठी अनेक जण का बोलत नाहीत?” असा सवाल केला.
विवेक ओबेरॉय यांच्या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावर मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. काहींना त्यांची भूमिका योग्य वाटत असली, तरी अनेकांनी सार्वजनिक व्यक्तींनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





