Aamir Khan: ‘आम्हाला सोनम वांगचुक माहीतच नव्हते’; ‘3 इडियट्स’वर आमिर खानचा मोठा दावा
Aamir Khan आमिर यांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केल्याचे स्वागत केले, तर काहींना त्यांचे उत्तर अपुरे वाटले. 'कॉकरोच जनता पार्टी'चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही आमिर यांच्या प्रतिक्रियेला "निराशाजनक" असे म्हटले.

Aamir Khan: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर अभिनेता आमिर खान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर आमिर खान शांत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या विषयावर भाष्य करत ‘3 इडियट्स’ चित्रपटातील फुन्सुख वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी उपोषण लवकर संपवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट (BFI) येथे आयोजित कार्यक्रमात आमिर खान यांना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पत्रकाराने ‘3 इडियट्स’ चित्रपटाचा उल्लेख करत, अनेकांचा असा समज आहे की या चित्रपटातील फुन्सुख वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर आधारित आहे, असे म्हटले. त्यावर आमिर यांनी हा समज चुकीचा असल्याचे सांगितले.

Sonam Wangchuk Hunger Strike
आमिर म्हणाले, “हे पूर्णपणे गैरसमज आहे. आम्ही ‘3 इडियट्स’ चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला, दिग्दर्शक राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजात जोशी यांना सोनम वांगचुक यांची माहितीही नव्हती. त्यामुळे त्या पात्राचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता.”
आमिर यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी चित्रपटातील ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्य यांचा एक व्हिडिओ पाहिला होता. त्या व्हिडिओमध्ये ओमी यांनी फुन्सुख वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचे म्हटले होते. मात्र, आमिर यांनी त्यालाही चुकीचे ठरवत, “तो ओमीचा समज असू शकतो, पण वस्तुस्थिती तशी नाही,” असे स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचे कौतुकही केले. “सोनम वांगचुक चांगले काम करत आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा संबंध ‘3 इडियट्स’शी असण्याची गरज नाही. त्यांनी समाजासाठी केलेले काम स्वतःच महत्त्वाचे आहे,” असे आमिर म्हणाले.
विशेष म्हणजे, सोनम वांगचुक यांनीही यापूर्वी अनेकदा ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या विषयावर तथ्य स्पष्ट करणे आवश्यक वाटल्याने आपण हे स्पष्टीकरण दिल्याचे आमिर यांनी नमूद केले.
Today at @BFI I asked Mr Amir Khan about @Wangchuk66 and his fast. Here is his response: @abhijeet_dipke @CJP_2029 @Cockroachisback @SauravDassss pic.twitter.com/jkeKFssrDX
— nabanita sircar (@sircarnabanita) July 16, 2026
यानंतर आमिर खान यांना सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता, त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. “त्यांच्या आरोग्याची आणि जीवाची आम्हा सर्वांना काळजी वाटते. हे प्रकरण लवकर मार्गी लागावे आणि त्यांनी उपोषण सोडून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी आमची इच्छा आहे,” असे आमिर म्हणाले.
आमिर यांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केल्याचे स्वागत केले, तर काहींना त्यांचे उत्तर अपुरे वाटले. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही आमिर यांच्या प्रतिक्रियेला “निराशाजनक” असे म्हटले.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. झीनत अमान, सोनी राजदान, ओमी वैद्य, इमरान खान, स्वरा भास्कर, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा आणि फातिमा सना शेख यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. तसेच त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत या आंदोलनावर लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.





