Katrina Kaif Birthday: फ्लॉप डेब्यूपासून ब्लॉकबस्टर क्वीनपर्यंत; कतरिना कैफचा भन्नाट प्रवास
Katrina Kaif Birthday १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये कतरिनाचा जन्म झाला. तिचे मूळ नाव 'कतरिना टॉर्केटी' असल्याचे सांगितले जाते. तिचे वडील मोहम्मद कैफ आणि आई सुझान आहेत.

Katrina Kaif Birthday: बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कतरिना कैफचा आज ४३ वा वाढदिवस आहे. आपल्या सौंदर्य, मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करूनही कतरिनाने कधी हार मानली नाही. त्यामुळेच आज ती बॉलीवूडमधील सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
१६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये कतरिनाचा जन्म झाला. तिचे मूळ नाव ‘कतरिना टॉर्केटी’ असल्याचे सांगितले जाते. तिचे वडील मोहम्मद कैफ आणि आई सुझान आहेत. सात भावंडांमध्ये कतरिना चौथ्या क्रमांकावर आहे. लहान वयातच तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. अनेक फॅशन शो आणि जाहिरातींमध्ये काम करत असताना तिच्याकडे चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले.
कतरिनाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बूम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिला महानायक अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. चित्रपटातील बोल्ड आशय आणि कतरिनाच्या ग्लॅमरस लूकची चर्चा झाली, पण तिच्या करिअरला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही.
पहिल्याच चित्रपटाच्या अपयशामुळे अनेक जण मागे हटले असते, पण कतरिनाने तसे केले नाही. तिने सातत्याने स्वतःवर मेहनत घेतली. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अभिनय कौशल्य सुधारले आणि प्रत्येक संधीचा सकारात्मक वापर केला.

Katrina Kaif
‘बूम’नंतर तिने तेलुगू चित्रपट ‘मल्लीस्वरी’मध्ये काम केले. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि कतरिनाच्या आत्मविश्वासात भर पडली. त्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘सरकार’ चित्रपटात तिला छोटी पण महत्त्वाची भूमिका दिली. या भूमिकेमुळेही तिच्या कामाची दखल घेतली गेली.
मात्र कतरिनाच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरला तो सलमान खानसोबतचा ‘मैंने प्यार क्यों किया’ हा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आणि कतरिनाच्या करिअरला नवी दिशा मिळाली. त्यानंतर तिला मोठ्या बॅनरचे आणि मोठ्या कलाकारांसोबतचे चित्रपट मिळू लागले.
यानंतर कतरिनाने मागे वळून पाहिलेच नाही. ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘पार्टनर’, ‘सिंह इज किंग’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘राजनीती’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जब तक है जान’, ‘धूम ३’, ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’ आणि ‘फँटम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या. रोमँटिक, कॉमेडी, अॅक्शन आणि गंभीर अशा विविध प्रकारच्या भूमिका तिने यशस्वीपणे साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
कतरिनाची स्क्रीनवरील उपस्थिती, नृत्यकौशल्य आणि मेहनती स्वभावामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. सुरुवातीला ‘आऊटसाइडर’ असल्याने आणि हिंदी नीट येत नसल्याने तिच्यावर टीका झाली होती. मात्र तिने त्या टीकेला उत्तर शब्दांनी नाही, तर आपल्या कामगिरीने दिले.
आज कतरिना कैफ केवळ यशस्वी अभिनेत्री नाही, तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. अपयशानंतरही खचून न जाता सातत्याने मेहनत केली तर यश नक्की मिळते, हे तिने आपल्या प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. ‘बूम’सारख्या अपयशी चित्रपटातून सुरुवात करून बॉलीवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होण्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.





