“मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर ‘कबड्डीचा’; भाजपात जाताच उदय सांगळेंनी कोकाटेंवर साधला निशाणा

Uday Sangle : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपने येथे मोठी राजकीय खेळी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सिन्नरचे उदय सांगळे यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. यानंतर नाशिकच्या राजकारणात महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
नुकतेच उदय सांगळे यांनी आपल्या हाती कमळ घेतले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. भाजपात पक्ष प्रवेश करताच उदय सांगळे यांनी राष्ट्रवादीचे माजी कृषीमंत्री आणि सध्याचे विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा भारतावर मोठा परिणाम ; रशियन तेलाच्या पुरवठ्यात लक्षणीय घट
मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कबड्डीचा असे म्हणत उदय सांगळे यांनी माणिकराव कोकाटे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सिन्नरमध्ये पाणी प्रश्न आणि तर समस्या कायम आहेत यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केलेल्या टीकेवरून सिन्नरचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कोण आहेत उदय सांगळे?
गेली सिन्नर विधानसभेची निवडणूक उदय सांगळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती. याच मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे विजयी झालेले आहेत. सांगळे हे अगोदर उद्धवसेनेत होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उदय सांगळे यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांना छुप्प्या पद्धतीने मदत केल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला होता, असेही ते म्हणाले होते.
..अन् हाती कमळ घेतले
उदय सांगळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारोस्कर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप राज्यात ठिकठिकाणी आपली ताकद वाढवताना दिसत आहे. सांगळे आणि चारोस्कार या दोघांचा पक्षप्रवेश नुकताच पार पडला. दोघांनीही त्यांच्या शेकडो समर्थकांसह आपल्या हाती कमळ घेतले आहे.
हेही वाचा : Celina Jaitley: १४ वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली सेलिना जेटली भावाच्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत





