“मी भाजपाचा भक्त, मोदींचा भक्त; मुंबईत कमळ फुलेल” – महेश कोठारे यांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई – मुंबई, ठाण्यासह आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असताना, अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपचे जोरदार कौतुक केले आहे. “मी भाजपाचा भक्त आहे, मोदींचा भक्त आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने महापालिका निवडणुकांची रंगत वाढत आहे, तर दुसरीकडे महायुती (भाजप, शिवसेना – एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) जोरदार तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर, मागाठाणे येथील एका कार्यक्रमात महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्याने महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे.
“भाजपा म्हणजे आपलं घर” –
मागाठाणे येथे आयोजित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी थेट भाजपचे कौतुक केले. ते म्हणाले, “भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे.” त्यांचे हे विधान लगेचच चर्चेचा विषय बनले आहे.
यावेळी बोलताना कोठारे यांनी मोठे भाकीत केले. ते म्हणाले, “आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल.” कोठारे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.
“मुंबईत नक्कीच कमळ फुलेल…” –
दिवाळी पहाट २०२५ च्या कार्यक्रमात बोलताना कोठारे यांनी आपला मोदी आणि भाजपवरील विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. “मी मोदीजींचा भक्त आहे, मी भाजपाचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही त्यांनी निवडणुकीदरम्यान भाजपला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी जुनी आठवण सांगत म्हटले, “जेव्हा मी पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की, ते खासदार निवडून देत नाहीत, तर मंत्री निवडून देत आहेत. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल.”
या कार्यक्रमाला भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, प्रवीण दरेकर यांच्यासह महेश कोठारे उपस्थित होते.





