जॉन चक्रिवादळ मेक्सिकोला धडकले; मुसळधार पावसामुळे महापूर येण्याचा धोका

पुएर्तो एस्कोंडिड – जॉन या खंडीय चक्रिवादळाने मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीला धडक दिली असून या वादळाच्या परिणामामुळे या भागात अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे महापूराचा धोकाही निर्माण झाला आहे. या वादळाचे रुपांतर काही तासातच ध्रुवीय चक्रिवादळात झाल्यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
सोमवारी रात्री उशिरा पुंता मालडोनाडो शहराजवळ हे वादळ किनाऱ्यावर आले. त्यावेळी या वादळाची तीव्रता श्रेणी ३ इतकी होती. वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी १२० मैल इतका होता. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा या वादळाची तीव्रता कमी झाली. तेंव्हा वाऱ्याचा वेग ताशी ७० मैल इतका कमी झाला होता. हे वादळ आणखी सौम्य होण्याचा अंदाज आहे.
मात्र तरिही या वादळामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे भूस्खलन आणि पूर येण्याचा धोका असल्याचे यूएस नॅशनल हरिकेन सेंटरने म्हटले आहे. अनेक भागात दरडी कोसळण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण-पश्चिम मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिआपास, ओक्साका आणि गुरेरो राज्यांच्या काही भागांमध्ये लक्षणीय आणि संभाव्य आपत्ती, जीवघेणा पूर आणि चिखल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.





