हुमणीने खातेयं उसाचा फड…

नांदुर परिसरात किडीमुळे शेतकरी हैराण

नांदुर- अनियमित पावसामुळे आधीच हैराण झालेल्या राहु बेट परिसरातील शेतकरी आता हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. ऊस, भुईमूग ही पिके हुमणीच्या हल्ल्‌याला बळी पडली आहेत. उसाचे फडच्या फड यामुळे नष्ट झाले आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेली पीकं जळू लागली आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र, हुमणी आळी त्याला दाद देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन घ्यावे, याकरीता कारखान्याचा शेतकी विभाग तत्पर असल्याचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी राजेंद्र थोरात यांनी सांगितले.

वडगाव भांडे येथील शेतकरी भीमजी मेमाने यांचा चार एकरातील ऊस जळून गेला आहे. तर कोरेगाव येथील सोमनाथ खाडे यांच्या सहा महिन्याच्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 6 ते 8 फूट वाढलेला ऊस नष्ट झाला आहे. हुमणीचा प्रादुर्भाव झाला हे कळण्यापूर्वीच त्यांचे पीक उद्धवस्त झाले आहे. ऊसाच्या शेतात पहिल्यांदाच हुमणीचा प्रादुर्भाव झाला, यातून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ऊस, भुईमूग, सोयाबीन या पिकावर सध्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीबाबात माहिती नसल्यामुळे शेतकरी गोंधळात आहेत. किडीमुळे खरीप पिकाची वाढ खुंटली आहे. वरवर पाहता किड दिसत नाही. मात्र, रोप उपटल्यानंतर मुळाशी कीड दिसून येते. व्यवस्थित न कुजलेलं शेणखत शेतात टाकल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होतो. मॉन्सूनपूर्व 60 ते 70 मि.मी. पाऊस पडल्यास हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात आणि जवळच्या झाडांवर आश्रय घेतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here