पाकमध्ये सोशल मीडियावर बंदीला मानवी हक्क आयोगाचा विरोध

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला तेथील मानवी हक्क विषयक आयोगाने विरोध केला आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने देशभरात सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा ठराव नुकताच केला आहे. या ठरावाला आयोगाने विरोध करताना हा ठराव म्हणजे देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली केली जात असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे सिनेटर बहरामंद खान टांगी यांनी फेसबुक, एक्स, टिकटॉक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारा ठराव सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाने याला आक्षेप घेतला आहे.
समाज माध्यमांचे हे व्यासपीठ तरुण पिढीच्या भवितव्यासाठी घातक असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. आयोगाने नागरी समाज आणि डिजिटल अधिकार कार्यकर्त्यांना अशा मनमानी प्रतिबंध लादण्याच्या सर्व प्रयत्नांविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.





