गुजरात ते पश्चिम बंगाल… वक्फ विधेयक मंजूर होताच देशभरात मुस्लिमांचा आक्रोश, रस्त्यावर उतरत केला विरोध

Waqf (Amendment) Bill 2025 | वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर होताच पश्चिम बंगाल, गुजरातसह अनेक राज्यातील मुस्लिम नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार विरोध दर्शवल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी नमाज नंतर कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये मुस्लिम समुदायाच्या लोकांनी वक्फ विधेयकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, सरकारकडे हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली.
पश्चिम बंगालच्या राजधानीत शेकडो मुस्लिम नागरिक या विधेयकाला विरोध करत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. विधेयक मान्य नसल्याचे फलक हातात घेत त्यांनी विरोध दर्शवला.
वक्फ सुधारणा विधेयक 2025 लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील मंजूर झाले आहे. त्यानंतर आता या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसत आहे.
#WATCH | West Bengal: Members of the Muslim community take to the streets in Kolkata to protest against the Waqf Amendment Bill. pic.twitter.com/pKZrIVAYlz
— ANI (@ANI) April 4, 2025
गुजरातच्या अहमदाबादमधध्ये काही मुस्लिम संघटना वक्फ विधेयकाविरोधात निदर्शने करत ‘तानाशाही नहीं चलेगी’ आणि ‘काला कानून वापस लो’ अशा घोषणाही दिल्या. या दरम्यान पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या अनेक लोकांना ताब्यात घेतले.
चेन्नईमध्येही या विधेयकाला विरोध दर्शवण्यात आला. अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगमनेही राज्यव्यापी विरोध प्रदर्शनाची घोषणा केली. चेन्नई, कोईम्बतूर आणि तिरुचिरापल्ली येथे पक्षाकडून आंदोलन करत ‘वक्फ विधेयकाला विरोध करा’ आणि ‘मुस्लिमांचे अधिकार हिरावून घेऊ नका’ अशा घोषणा दिल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथेही मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.
दरम्यान, काँग्रेसने वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी याचिका दाखल करत वक्फ विधेयक मुस्लिम समुदायासाठी भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे.





