Prashant Jagtap : “पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपची दादागिरी कशी वाढली…”; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणी प्रशांत जगताप भडकले
Prashant Jagtap : या प्रकारानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Prashant Jagtap : पुण्यातील गणेशोत्सवात डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत प्रतिक्रिया देत असताना उपस्थित असलेल्या एका तरुणाने अचानक बापट यांच्या कानशिलात लगावली. पुण्यातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकारानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
नेमकं काय घडलं?
विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत असताना अचानक एक तरुण तिथे आला. त्याने बापट यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला बाजूला केलं आणि रोखलं. या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर बापट यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली.
प्रशांत जगतापांकडून घटनेचा निषेध
या मारहाण प्रकरणावर काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले. प्रशांत जगताप म्हणाले, “पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपची दादागिरी कशी वाढली आहे, याचं हे उदाहरण आहे. चुकीच्या प्रवृत्तींना सरकारकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाप्रकारे हल्ले होणे किंवा पहाटे रिलस्टार संतोष पंडित यांना अटक होणे, ही हुकूमशाहीची लक्षणं आहेत.”
जगताप पुढे म्हणाले की, विद्यानंद बापट हे पुणेकरांच्या वतीने या विषयावर आवाज उठवत आहेत. त्यांचा गणेशोत्सव किंवा धार्मिक सणांना विरोध नाही. मात्र, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाविरोधात ते भूमिका मांडत आहेत.
“डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना विविध प्रकारचे आरोग्यविषयक त्रास होत आहेत. या संदर्भात बापट आवाज उठवत आहेत. मात्र, सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्याने त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आता तर थेट मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे,” असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. या घटनेनंतर विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, मारहाण करणाऱ्या तरुणावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Israel Iran War: ‘इराणला मदत केली तर…’; मोदी-पेझेश्कियन भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा इशारा






