Systematic Investment Plan: गेल्याकाही वर्षात भारतात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. टप्प्याटप्प्याने ठराविक रक्कम गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असल्याने एसआयपी म्युच्युअल फंड्स लोकप्रिय होत आहेत. एकीकडे शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू असताना दुसरीकडे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड्समध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा वाढतच चालला आहे.
अनेकदा दरमहिना 1000-2000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता, असे आपण वाचतो. मात्र, लवकरात लवकर 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी नक्की किती कालावधी लागू शकतो? तुम्ही देखील हा विचार करत असाल तर दरमहिन्याला किती रक्कम गुंतवायला हवी, याविषयी जाणून घ्या
दरमहिना 1,000 रुपये एसआयपी
दरमहिना 1हजार रुपये एसआयपी आणि वर्षाला 10 टक्के स्टेप अप (अतिरिक्त गुंतवणूक) स्वरुपात गुंतवले. सोबतच, वर्षाला 12 टक्के सरासरी परतावा प्राप्त झाल्यास 31 वर्षांमध्ये तुमच्याकडे 1.02 कोटी रुपये जमा होतील. यामध्ये तुमची गुंतवणूक 21.83 लाख रुपये आणि 79.95 लाख रुपये व्याज परतावा असेल.
दरमहिना 2,000 रुपये एसआयपी
समजा, तुम्ही दरमहिना 2000 रुपये एसआयपी करत आहात. सोबतच, वर्षाला 10 टक्के अतिरिक्त गुंतवणूक करताय व यावर तुम्हाला सरासरी 12 टक्के व्याज मिळत असल्यास 27 वर्षांमध्ये तुम्ही 1 कोटींचा टप्पा गाठू शकता.
दरमहिना 3,000 रुपये एसआयपी
समजा, दरमहिना 3 हजार रुपये एसआयपी आणि वर्षाला 10 टक्के अतिरिक्त गुंतवणूक केली. तर पुढील 24 वर्षांमध्ये 1.10 कोटी रुपये एवढी रक्कम जमा होईल. यामध्ये गुंतवलेली रक्कम 31.86 लाख रुपये आणि परतावा 78.61 लाख रुपये असेल. मात्र, यासाठी गुंतवणुकीवर वर्षाला 12 टक्के परतावा मिळणे आवश्यक आहे.
दरमहिना 5,000 रुपये एसआयपी
दरमहिना 5 हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवून 21 वर्षात 1 कोटी रुपयांचा आकडा गाठू शकता. मात्र, यासाठी दरवर्षी 10 टक्के अतिरिक्त रक्कमेची गुंतवणूक करावी लागेल. सोबतच, वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळायला हवा. यानंतरच 21 वर्षामध्ये 1.16 कोटी रुपये जमा होतील. यामध्ये एकूण गुंतवणूक 38.40 लाख रुपये आणि परतावा 77.96 लाख रुपये असेल.
मात्र, लक्षात घ्या की कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे एसआयपीमध्येही जोखीम असते. तसेच, दरवर्षी अपेक्षित परतावा मिळेलच असे नाही.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)