Nagar | जेऊर, इमांमपूर, मांजरसुंबा परिसरात ड्रोनच्या घिरट्या

नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील जेऊर (बा), इमांमपूर, मांजरसुंबा परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.
मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी ड्रोनच्या घिरट्या सुरु असल्याचा प्रकार समोर येत होता. आता नगर तालुक्यातील जेऊर (बा), इमांमपूर, ससेवाडी, मांजरसुंबा, धनगरवाडी परिसरात रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन फिरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्रीत ड्रोन फिरवून त्या माध्यमातून हायटेक चोरी करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल ग्रामस्थामधून उपस्थित केला जात आहे. गावात वाड्यावस्त्यावर रात्रीच आकाशात तीन ते चार ड्रोन लुकलुकतांना दिसत आहेत.
मात्र, हे ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात का घिरट्या घालतात असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. जेऊर पंचक्रोशीतील सर्वच गावांमध्ये डोंगर परिसरात ड्रोन फिरत असल्याचे आढळून येत आहे.
याबाबत लवकरच खुलासा केला जाईल, असे काही ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून न जाता तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरूनये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून जेऊर, मांजरसुंबा, देहरे परिसरात ड्रोन फिरत असल्याचे काही नागरिकांचे म्हणने आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. माणिक चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे





