नेवासा: इमामपूरात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

नेवासा – इमामपूर (ता. नेवासा) येथे सोमवारी (दि. १२ मे) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीज कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक कामगार किरकोळ जखमी झाला. गणेश शिवाजी काळे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने इमामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश काळे यांच्यासह परिसरातील सहा-सात शेतकरी आणि नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करणारे पाच-सहा कामगार शेतातील रोहित्राचे काम आटोपून घरी परतत होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. सहा वाजता आकाशात वीज कडाडली आणि ती गणेश यांच्या अंगावर कोसळली. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. याच घटनेत एका कामगाराला किरकोळ वीजेचा धक्का बसला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
मयत गणेश यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि चार बहिणी असा परिवार आहे. या आकस्मिक धक्क्याने काळे कुटुंबीयांसह संपूर्ण गाव शोकाकुल आहे.
आमदार लंघेंकडून सांत्वन, मदतीचे निर्देश –
मंगळवारी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी इमामपूर येथे भेट देऊन काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना काळे कुटुंबाला तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले.





