पुणे जिल्हा | पंचाळे खुर्द येथे जमिनीला भेगा, दुर्घटना होण्याच्या शक्यतेने भीतीचे वातावरण

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत. या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असून या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शासनाने या गोष्टीची दखल घेऊन येथील रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.
आदिवासी भागात डिंभे धरणालगत असलेल्या पंचाळे खुर्द गावात भूस्खलन झाले असून या ठिकाणी असलेल्या रवळ्याच्या डोंगराच्या पायथ्याला भेगा पडल्या आहेत. तसेच गावाच्या दुसऱ्या बाजूला जमिनीला भेगा पडल्या असून सदर भेगा दोन ते तीन फूट खोल व ६० ते ७० फूट लांब आहेत. २००३ साली अशाच प्रकारे भूस्खलन झाले होते.
त्यावेळी भूगर्भ तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांनी येऊन जमिनीची पाहणी करून येथील असणाऱ्या ४५ कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे किंव्हा भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर शासनाच्या वतीने आपत्कालीन पुनर्वसन जाहीर करण्यात आले होते.
प्रत्येकी कुटुंबाला चाळीस हजार रुपये मदत स्वरूपात देण्याचे ठरले होते. गावठाणाची मोजणी देखील झाली होती. मात्र, प्रकरणाची फाईल ही मंत्रालयातच पडून असल्याने पुढची कारवाई झाली नाही व सदर कुटुंब अजूनही त्याच ठिकाणी वास्तव्य करत आहेत.
आदिवासी भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून पंचाळे खुर्द येथील जमिनीला भेगा पडल्या असून २००३ प्रमाणेच पुन्हा प्रकार घडल्याने येथील कुटुंब भीतीचे सावटाखाली असून रात्रीच्या वेळी सर्व नागरिक जागून काढत आहे. त्यामुळे शासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ येथील कुटुंबांचे पुनर्वसन करावे. अशी मागणी ग्रामस्थ राजू गोनटे आणि स्थानिक नागरिक यांनी केली आहे.
माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती – बुधाजी डामसे
दरम्यान माळीणची घटना ज्यावेळी घडली, त्या अगोदर पंचाळे खुर्द येथे २००३ साली भूस्खलन झाले होते. त्यावेळी शास्त्रज्ञ भूगर्भ तज्ज्ञ यांनी जागेची पाहणी करून तात्काळ पुनर्वसन करावे, असे शासनाला कळवले होते. त्यावेळीं या संदर्भात गावठाणाचा आराखडा तयार होऊन भूखंड पाडण्यात आले सर्वांना घरकुले देण्याचे ठरले होते.
मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही व आता रविवार दि. २८ रोजी पुन्हा एकदा याच ठिकाणी भूत्खलन झाले असून जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पंचाळे खुर्द हे गाव डिब्बे धरणाच्या जवळ असल्याने भविष्यात भूस्खलन झाले.
तर संपूर्ण गाव हे गाडले जाऊ शकते व माळीणसारखी घटना पुन्हा घडू शकते. त्यामुळे सरकारने याकडे तात्काळ लक्ष घालून येथे वास्तव्य करणाऱ्या ४५ कुटुंबांची तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बूधाजी डामसे यांनी सांगितले.





