satara | भरवस्तीत बिबट्याच्या वावराने निंबळक गावात भीतीचे वातावरण

विडणी, (प्रतिनिधी) – गेली काही वर्षे निंबळक, ता.फलटण व परिसरात वावरणारा बिबट्या शनिवारी रात्री ९ वाजता निंबळक गावात भरवस्तीत वावरत असल्याचे निर्दशनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही वर्षापासुन निंबळक आणि टाकळवाडे गावच्या हद्दीच्या परीसरात बिबट्याचा वावर होता.
या परीसरात वनविभागाने कॅमेरे बसविले असता त्या मध्ये बिबट्या दिसत होता. त्यानंतर पिंजरे बसवुन सुध्दा बिबट्या हुलकावनी देत होता. शेवटी वनविभाग सुध्दा बिबट्याला पकडण्यासाठी हतबल झाले. त्यानंतर काही दिवस बिबट्या येथील ग्रामस्थांना अनेक वेळा दिसला.
दरम्यानच्या काळात अनेक शेतकरी, मजुर यांच्या शेळ्या, बोकड, लहान वासरे, कुञी बिबट्याकडुन फस्त होत होती. वनविभाग पंचनामा करुन नुकसान भरपाई सुध्दा देत होते. परंतु बिबट्या काही वनविभागाला सापडेना. गेल्या महिन्यात तर बिबट्याने कहरच केला दिडशे किलोचा घोडाच फस्त केला.
या घटनेमुळे निंबळक व टाकळवाडे परीसरातील ग्रामस्थ भयभीत झाले. अनेक दिवस बिबट्या शेतात, वस्तीवर येत होता. परंतु शनिवारी राजी कहरच झाला बिबट्याची मजल भरवस्तीपर्यत गेली. भला मोठा पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याने ग्रामस्थामध्ये घबराट पसरली आहे.





