नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात रिझर्व बँकेने व्याजदरात विविध टप्प्यात सव्वा टक्क्याची कपात केली आहे. यापैकी व्यवसायिक बँकांनी ग्राहकांना 0.32 टक्क्यांचा लाभ अगोदरच दिला आहे. मात्र सरलेल्या वर्षात घर विक्री संख्येत कमी मात्र मूल्यात जास्त झाल्याची आकडेवारी विविध मूल्यांकन करणार्या संस्थांनी जाहीर केली आहे. स्क्वेअर यार्ड या संस्थेने सांगितले की 25 डिसेंबरपर्यंत घर विक्री पाच टक्क्यांनी कमी होऊन 5.45 लाख युनिट झाली आहे. ही आकडेवारी देशातील नऊ मोठ्या शहरासंदर्भातील आहे. मात्र या वर्षात घर विक्रीचे मूल्य अकरा टक्क्यांनी वाढून 4.46 लाख कोटी रुपये झाले आहे. याकडेवारीसाठी पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, बंगलोर, हैदराबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद या शहरांचा विचार केला आहे. यासाठी पहिल्यांदा विकलेल्या आणि फेरविक्री केलेल्या घरांची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे. या संस्थेने सांगितले की, 2024 मध्ये 5.77 लाख कोटी घरांची विक्री 4.03 लाख कोटी रुपयांना झाली होती. या संस्थेचे संस्थापक तनुज शौरी यांनी सांगितले की, काही लोकांच्या उत्पन्नात जास्त वेगाने वाढ झाली आहे. त्या लोकांनी जास्त किमतीची घरे विकत घेतली असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षात घरांच्या दरात एकतर्फी वाढ झाली आहे. त्यामुळे घर विक्रीवर त्याचा परिणाम जाणू लागला असल्याचे दिसून येते. घरांच्या मागणीवर फारसा नकारात्मक परिणाम झाला नसला तरी 2026 मध्ये जास्त किमतीच्या घरांची विक्री स्थिरावेल आणि कमी व मध्यम किमतीच्या घरांची विक्री वाढण्यास पूरक वातावरण निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. रिअल इस्टेट क्षेत्र आगामी वर्षाबाबत आशावादी आहे. व्याजदर कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर घरांच्या कच्च्या मालाच्या किमती स्थिरावल्या आहेत. अशा परिस्थितीत पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात घरनिर्मितीसाठी सकारात्मक उपाययोजना जाहीर झाल्या तर या क्षेत्राची उत्पादकता आणखी वाढण्यास मदत होईल असे समजले जात आहे. जर घर निर्मीती आणि खरेदी वाढली तर या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या इतर क्षेत्राची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. त्यामध्ये सिमेंट, विटा, पोलाद, काच इत्यादीचा समावेश आहे.