Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार (Sunil Kedar) यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने राजपत्र काढण्यात आलं आहे. यात केदार यांची आमदारची रद्द केली असल्याचा उल्लेख आहे. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सुनील केदार यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यावर भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी संशय व्यक्त केला आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, “सुनील केदार यांना लगेच रुग्णालयात दाखल करणे संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ज्या पद्धतीने ललित पाटीलला तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले होते तसाच हा प्रकार आहे.” सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिली असून त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “22 तारखेला न्यायालयाने सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात दाखल आहेत.” या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना मायग्रेनच्या उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.