US-Israel-Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. या इशाऱ्यानंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे. भारतासह मित्र राष्ट्रांना हा जलमार्ग खुला राहील, असे इराणच्या वरिष्ठ प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे. मात्र, शत्रू देशांच्या (प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल) जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानी नाकारली आहे. या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या भारताची सुमारे २२ जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अडकलेली आहेत. भारत सरकारकडून इराणशी सतत संपर्क ठेवला जात असून, इराणच्या या निर्णयाने भारतीय जहाजांना मार्ग मिळण्याची शक्यता वाढली आहे. जर 5 भारतीय जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी मिळाली, तर देशातील संभाव्य ऊर्जा संकट टाळता येऊ शकते. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील (आयएमओ) इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी रविवारी सांगितले की, ज्या जहाजांचा इराणच्या शत्रूंशी संबंध नाही, ती जहाजे तेहरानसोबत सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत समन्वय साधून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतात. इराण या आखाती क्षेत्रात सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी आणि खलाशांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेसोबत सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, सध्या होर्मुझच्या समुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावासाठी इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवरील हल्लेच कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला. मुत्सद्देगिरी हेच इराणचे प्राधान्य आहे. मात्र, आक्रमकता पूर्णपणे थांबवणे तसेच परस्पर विश्वास आणि खात्री असणे अधिक महत्त्वाचे आहे असे मौसावी यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी नौदल युती करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बहुतांश नाटो मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे.