Hong Kong Open 2024 : ‘जॉली-गायत्री’ जोडी प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभूत…

Hong Kong Open 2024 (Badminton) : कॉमनवेल्थ गेम्सच्या कांस्यपदक विजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला गुरुवारी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन महिला दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उप-उपांत्यपूर्व फेरी,Round of 16) चीनच्या लियू शेंग आणि तान निंग यांच्याकडून पराभूत होण्यापूर्वी खडतर आव्हानाचा सामना करावा लागला.
लिऊ आणि निंग यांनी 21-11, 22-20 असा विजय मिळवत आगेकूच केली तर पराभवानंतर भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात आलं आहे. पहिला गेम एकतर्फी झाला, कारण द्वितीय मानांकित चिनी जोडीने 3-2 ने पुढे जात गेम 21-11 ने जिंकला. परंतु बिगरमानांकित भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले, जिथे त्यांनी कडवी झुंज दिली आणि 15-15 आणि नंतर 20-20 अशी बरोबरी साधली, परंतु चीनच्या जोडीने 22-20 असा गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला. हा सामना जवळपास 41 मिनिटे चालला.
जागतिक क्रमवारीत 26व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाचा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी संघाविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे, जे आता 2-1ने पुढे आहेत. दरम्यान, जॉली आणि गायत्री यांनी याआधी पहिल्या फेरीत युक्रेनच्या पोलिना बुहारोवा आणि येव्हेनिया कांतेमिर यांचा 21-14, 21-13 असा पराभव केला होता.
एकेरीतही निराशा….
दरम्यान, भारताची एकेरी मोहीम बुधवारी संपली. पुरुष एकेरीत प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. महिला एकेरीत आकर्षी कश्यप आणि तान्या हेमंत यांनाही पुढील फेरीत प्रवेश करता आला नाही आणि भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आलं.





