Asia Cup 2025 : बाबरला मिळाली उपकर्णधारपदाची जबाबदारी, आशिया कपमध्ये पाकिस्तानी खेळाडू करणार हाँगकाँगचे नेतृत्व

Hong Kong Asia Cup 2025 Squad Announce : आगामी टी-20 आशिया कप 2025 साठी हाँगकाँग क्रिकेट संघाने तयारी करण्याच्या शिबिरासाठी 20 खेळाडूंची निवड जाहीर केली आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी हाँगकाँगने पाकिस्तानात जन्मलेल्या यासिम मुर्तझाकडे कर्णधारपद सोपवले आहे, तर बाबर हयात उपकर्णधार असेल. या स्पर्धेत हाँगकाँगचा समावेश ग्रुप बी मध्ये असून, त्यांचा सामना बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याशी होणार आहे.
यासिम मुर्तझा: अनुभवी अष्टपैलू खेळाडू
34 वर्षीय यासिम मुर्तजा हा खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्याने 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 746 धावा केल्या असून, यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 70 विकेट्स घेतल्या असून, 9 धावांत 4 विकेट्स ही त्याचा सर्वोत्तम कामगिरी आहे. 2007 मध्ये पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमधून पदार्पण करणारा यासिम 2022 पासून हाँगकाँगसाठी खेळत आहे.
संघातील प्रमुख खेळाडू –
उपकर्णधार बाबर हयात हा देखील पाकिस्तानात जन्मलेला खेळाडू आहे. याशिवाय, झिशान अली, निजाकत खान, अहसान खान आणि अंशुमन रथ हे संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. अंशुमन रथ याने यापूर्वी हाँगकाँगचे कर्णधारपद भूषवले आहे. 2019 मध्ये त्याने हाँगकाँग क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भारतात खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि 2021-22 हंगामात त्याने ओडिशासाठी खेळला. मात्र, 2023 मध्ये तो पुन्हा हाँगकाँगकडे परतला.
आशिया कपमधील सहभाग –
हाँगकाँगचा संघ 24 ऑगस्ट रोजी यूएईला पोहोचेल आणि स्पर्धेपूर्वी तिथे सराव सामने खेळेल. हाँगकाँगचा पहिला सामना 9 सप्टेंबर रोजी अबुधाबीत अफगाणिस्तानविरुद्ध होईल, त्यानंतर 11 सप्टेंबरला बांगलादेश आणि 15 सप्टेंबरला श्रीलंकेशी सामना होईल. हाँगकाँग पाचव्यांदा आशिया कपमध्ये सहभागी होत आहे. यापूर्वी त्यांनी 2004, 2008, 2018 आणि 2022 मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता.
आशिया कपसाठी हाँगकाँगचा 20 खेळाडूंचा संघ:
यासिम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), झिशान अली (यष्टीरक्षक), निजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएट्जी, अंशुमन रथ, अहसान खान, कल्हान मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, अनस खान, हारून मोहम्मद अरशद, अली-हसन, शाहिद वासिफ (यष्टीरक्षक), गझनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद.
आशिया कपसाठी अंतिम 17 खेळाडूंची निवड नंतर जाहीर केली जाईल. हाँगकाँगचा संघ या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.





