कोल्हापूर : प्रामाणिकता हा सर्व मानवी सद्गुणांचा पाया आहे आपली दूरदृष्टी जगाच्या कल्याणासाठी असली पाहीजे, ती स्वत:पूर्ती मर्यादीत असू नये, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांकरिता ‘प्रशासकीय कौशल्ये’ वृध्दींगत करण्याच्या दृष्टीकोनातून 11 आणि 12 जानेवारी या कालावधीमध्ये दोन दिवसीय ‘निवासी प्रशिक्षण शिबिर’ पाचगणी येथील बहाई ॲकॅडमी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासकीय सेवकांना मार्गदर्शन करताना कुलसचिव डॉ.नांदवडेकर बोलत होते.

कुलसचिव डॉ.नांदवडेकर पुढे म्हणाले, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या कामामधील वेगळेपण टिकवून ठेवणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या भविष्यकालीन उत्तम वाटचालीसाठी परीश्रमपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तंत्रज्ञानाचा वापर जागरूकतेने आणि नव निर्मितीसाठी करावे.

कामाचे योग्य पध्दतीन नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास कोणत्याही प्रकारचे ताण येणार नाही आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होणार नाही. कार्यालयांमध्ये कामे करीत असताना संस्थेप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती किंवा स्वत:प्रती उत्तम विचार बाळगल्यास आनंदी जीवन जगणे सुसहय होईल.

एकमेकांचे हुतूपुरस्कर तिरस्कार करणे टाळावे. परस्परांना सहकार्य करून स्वत:च्या कामाप्रती स्पर्धा करून प्रशासनाचा गाढा पुढे घेवून जाण्यासाठी कार्य रूपी चाकांना गती दिली पाहिजे.

दैनंदिन कामांमध्ये प्रशासकीय कौशल्ये, परस्पर व्यक्ती संबंध, आदर्श कार्य जीवन, सकारात्मक दृष्टी, आयसीटी याचा योग्यपध्दतीने अंतर्भाव केल्यास आनंदायी प्रशासन निर्माण करण्यास सुखकर मार्ग निर्माण होईल.

पुणे येथील तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉ.रचना शिखरे तणाव व्यवथापनाबाबत मार्गदर्शन करताना म्हणाल्या, कार्य पध्दतीचा उत्कृष्ट नमुना निर्माण करण्यासाठी स्वत:मध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे.

अनावश्यक मानसिक ताणाचे ओझे वाहणे टाळावे. नाकारात्मक विचारांपासून नेहमी अलिप्त राहिले पाहिजे. स्वत:वर असलेला विश्वास, मानवी जीवन मतबूत बनविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.

चालणे, फिरणे, सायकल चालविणे, व्यायाम करणे, मनमोकळे हसणे, निसर्गाच्या सानिध्यात राहणे, खेळणे या प्रकारांमुळे ताण-तणावपासून दूर होण्यास निश्चित उपयोग होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव यांनी व्यवस्थापन कौशल्ये विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाले, आपण आपल्या कामाप्रती उत्तरदायी होण्याचा नेहमी पूर्ण प्रयत्न करावा. कुटुंबामध्ये चांगले समन्वये साधल्यास समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी निश्चितच उत्तम समन्वय साधता येईल. एकाच वेळेस दोन पध्दतीने विचार केल्यास समस्या सोडविण्यास मदत होते.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बहाई ॲकॅडमीचे संचालक डॉ.लेझन आझादी म्हणाले, प्रत्येक घटकाप्रती मानवी मूल्यांची जपणूक करीत कामे पूर्ण करीत राहिल्यास देशाचे भवितव्य उज्वल होईल. कार्यालयांमध्ये आपले कर्तव्ये मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न केल्यास आनंद प्राप्त होतो.

चांगले कामे करीत असताना प्रत्येक वेळेस आपली स्तुती होईल असे नाही, आपणास कष्ट होईल, अडचणी येतील. परंतु, विद्यापीठाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी जास्तीत जास्त कष्ट करण्याचा प्रयत्नांपासून परावृत्त होवू नये.

या प्रशिक्षणामध्ये विद्यापीठातील पन्नास प्रशासकीय सेवकांचा समावेश होता. यावेळी कौशल्ये विकास अधिकारी महेश चव्हाण यांचेसह तज्ज्ञ व्यक्ती डॉ.रॉड उपस्थित होते.