Pune : पायाभूत, संख्याज्ञान चाचणी लांबणीवर

पुणे : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्याने चाचणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चाचणीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी यांना योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे.
या योजनेअंतर्गत रविवारी (दि. २) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेण्याचे नियोजन होते. मात्र, त्याच दिवशी एमपीएससीच्या परीक्षा असल्याने केंद्रीय शिक्षणमंत्रालयाला चाचणी पुढे ढकलण्यास परवानगी देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यास शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिल्याने चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.





