नीरा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे नीरा स्नान झाल्यानंतर पालखीने सातारा जिल्ह्यात गुरूवारी (दि.२६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. त्यावेळी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पाडेगाव (ता.खंडाळा) येथील हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पठाणशाह बाबा यांच्या दर्गाहमध्ये जाऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंञी ना. मकरंद पाटील , संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी समाधीचे दर्शन घेतले. हजरत पठाणशाह बाबा दर्गाह ट्स्टने वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करीत हिंदू मुस्लीमऐक्याचा पाया घालण्याचा प्रयत्न केला. दर्गाह ट्रस्टच्या या उपक्रमाचे ना.पाटील व सोहळा प्रमुखांनी कौतुक केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्याला निरोप देऊन गुरूवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. त्यावेळी सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाडेगाव (ता.खंडाळा) येथील हजरत पठाणशाह बाबा दर्गाह आहे. ही दर्गाह गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांच्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देत अल्पोपहाराचे वाटप ही करण्यात येते. गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. तेव्हापासून पालखीच्या सातारा जिल्ह्यात आगमनापूर्वीच शेकडो वारकरी दोन दिवसांपासून दर्गामध्ये विश्रांती घेतात. थोडासा विसावा घेतात आणि नंतर पुन्हा ते आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. दरम्यान गुरुवारी वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सातारा जिल्ह्यात पालखीचे आगमन होताच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ तसेच विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दर्गाहमध्ये येऊन पठाणशाह बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार यांनी ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांचा सत्कार केला. दर्गाहमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .त्याबाबत सोहळाप्रमुख भावार्थ देखणे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांनी हजरत पठाणशाह बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार , सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, साताराचे जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज करपे, डीएचओ. महेश खलिपे आदी अधिकारी , पदाधिकारी तसेच वारकऱ्यांनी बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. ट्रस्टचे उपाध्यक्ष रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद, विश्वस्त मोहंम्मदगौस आतार, कार्यकर्ते सिकंदर शेख, मन्सूर सय्यद , आयुब मुलाणी, शाहनवाज शेख, मुस्तकीम आतार आदींनी विशेष परिश्रम घेतले.