कोथरुड – कोथरुड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित अभियानांतर्गत ज्या महिलांनी नावनोंदणी केली, अशा असंख्य भगिनींचा कोथरुड मधील परमहंस नगर, जीत मैदान येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात झाला. कोथरुड मतदारसंघातील सुमारे दहा हजार महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करून घेतली होती. यापैकी रविवारी (दि.२२) चार हजार महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक भगिनीस आकर्षक साडी भेट देण्यात आली. या मेळाव्यामध्ये महिलांच्या कलागुणांना आणि कर्तुत्वाला वाव मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, सोबत शासनाच्या विविध योजना, महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेल्या कायदे व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल बालवडकर यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. दरम्यान, परिसरातील समस्त भगिनींनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून आनंद द्विगुणित केला, याबद्दल सर्वांचे अमोल बालवडकर यांनी आभार मानून संवाद साधला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालवडकर यांचे बंधू आणि मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.