Summer Drinks : आरोग्यासाठी घरचे ‘ताक, पन्हे, सरबत, लस्सी’ लाभदायक; उन्हाळ्यात बाहेरचे पेय घेणे ठरू शकते हानिकारक

Summer Drinks – उन्हाळा सुरू झाला की, शरीराला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उकाड्यामुळे घाम येतो. त्यामुळे घसा कोरडा पडतो. आंबटगोड चवीचे लिंबूपाणी, कैरीचे पन्हे, लस्सी, ताक हे पेय पिल्यास शरीर टवटवीत होते.
कारण, यात साखर, मीठ व शरीरासाठी पोषक द्रव्य असतात. मात्र, हे पेय घरी तयार झालेले घेतले तर आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यात कोणतेही रासायनिक पदार्थ मिसळलेले नसतात, असा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला आहे.
घरीच विरजण लावून तयार केलेल्या ताक पोटासाठी उत्तम आहे. यामुळे उन्हाळ्यात पोट हलके राहते. यात मीठ, किंचित साखर, जिरेपूड, पुदिन्याची पाने घातली तर त्याची केवळ चवच वाढत नसून पचन शक्तीही सुधारते.
त्याचप्रमाणे कैरीचे पन्हे तर कोणालाही आवडते. पन्हे प्यायल्याने जिभेची चव वाढते. शरीरातील पाण्याची उणीव भरून निघते. पाहुणे आले तरी त्यांचे स्वागत करता येते.
उन्हाळ्यातील सर्वश्रुत असलेले पेय म्हणजे लिंबू सरबत, लिंबू पाणी कोणी केवळ मीठ घालून तर कोणी मीठ, साखर, पुदिना घालून लिंबू पाण्याची चव घेत उन्हाळा सुसह्य करत असतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये सिट्रस अॅसिड असल्याने ते पोटासाठी उत्तम, बद्धकोष्ठता कमी करणारे आहे.
यासोबतच लिंबू पाण्यामुळे तोंडाला चव येते. तसेच शरीरातील पाण्याची उणीवही भरून निघते. घरी तयार दह्यापासून लस्सी तयार करून पिल्यास पोटही भरते. हे पेय शक्तीवर्धक, क्षुधाशामक आहे.
हे सर्व पदार्थ रस्त्यावरील हॉकर्स, रेस्टॉरंटमधून घेतले तर ते शुद्ध आहेत की नाहीत, याची खात्री करूनच घ्यायला हवेत. त्यात भेसळ, रसायने, अशुद्ध बर्फ राहू शकतो, असे आरोग्य विभागाचे मत आहे.
फळांचा रस शक्यतो घरीच तयार करून घ्यायला हवे :
सध्या अनेकांच्या घरी ज्युसर असते. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड, आंबा, द्राक्ष, अननस अशा फळांचे रस शक्यतो घरीच तयार करून घेतले तर ते पोषक ठरतात. कारण, बाजारातील रस किंवा तयार रस खरेदी केल्यास त्यात प्रिझव्हेंटिव्ह, रंग, रसायनांचा वापर केलेला असतो.
अशा फळांच्या रसामध्ये शुद्धता नसते. त्यामुळे बरेचदा त्यामुळे शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे रस शुद्ध, बर्फविरहीत आहेत की नाही, खात्री करूनच ते घ्यावेत.
घराबाहेरील ताक, लिंबू शरबत, लस्सी व इतर शीतपेयांमध्ये रासायनिक पदार्थ, अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ तसेच त्यातील भेसळ ही शरीरासाठी अपायकारक असते.
त्याऐवजी घरी तयार केलेले पेय हे कोणत्याही भेसळीविना, रसायने न घालता तसेच शुद्ध पाण्यापासून फ्रिजमधील बर्फापासून तयार होतात. त्यामुळे अशा पेयांमुळे शरीरावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. त्यात शुद्धता असते. ते शरीरासाठी पोषक असतात.
– डॉ. विनायक पाटील, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी, वायसीएम रुग्णालय.





