हॉकी पुणे लीग : चार सामन्यांत विक्रमी ६२ गोल…

पुणे – हॉकी पुणे लीग मधील कनिष्ठ विभागात गोलांचा पाऊस पडला. एकाच दिवशी चार सामन्यांमध्ये विक्रमी ६२ गोलांची नोंद झाली. हॉकी महाराष्ट्रच्या मान्यतेने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर येथे रविवारी कनिष्ठ विभागात ब गटात रोव्हर्स हॉकी अकॅडमीने पुणे मॅजिशियन्सवर २१-० असा विजय मिळवला. हा सामना दिवसातील सर्वाधिक गोलसह दिवसात खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये सर्वाधिक फरकाने जिंकलेला सामना ठरला.
राहुल रसालाने (१० गोल) दोन हॅटट्रिकसह वैयक्तिक गोलसंख्या दुहेरी अंकावर नेली. ब गटातील दुसऱ्या सामन्यात पीसीएमसी क्लबने विक्रांत वॉरियर्स हॉकी क्लबचा १८-१ असा पराभव केला. आनंद गायकवाडचे हॅट्ट्रिकसह ९ गोल हे त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अ गटात हाय स्कोअरिंग सामन्यात पूना हॉकी अकॅडमीने पीसीएमसी अकॅडमी ‘ब’ संघाला १७-१ असे हरवले. त्यात रोनक वेडलेलू याने (५ गोल) छाप पाडली.
ज्युनियर विभागातील बहुतेक सामने एकतर्फी झाले. दिवसातील एकमेव चुरशीच्या लढतीत सेंट्रल रेल्वे, पुणे यांनी वरिष्ठ विभागात इन्कम टॅक्स, पुणे संघावर ३-१ अशी मात केली. स्टीफन स्वामीचे (१६वा, ३७वा) दोन गोल आणि मयूर नलावडेचा (५१वे) एकमेव गोल सेंट्रल रेल्वेला जिंकून देण्यात मोलाचा ठरला. इन्कम टॅक्सकडून चिराग मानेने (३४वे) एकमेव गोल केला.





