IND vs KAZ : भारताची हॉकी आशिया कपमध्ये विजयी हॅट्रिक, कझाकस्तानला 15-0 ने चारली धूळ!

IND vs KAZ Match Highlights : हॉकी आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला. भारताने तिसऱ्या सामन्यात कझाकस्तानवर 15-0 अशी एकतर्फी मात करत विजयाची हॅट्रिक नोंदवली. या विजयासह भारताने सुपर 4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत गोलचा पाऊस पाडला, तर कझाकस्तानला एकही गोल करता आला नाही.
चीन, जपाननंतर कझाकस्तानला चारली धूळ –
या सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंनी हॅट्रिक पूर्ण केली, ज्यामुळे हा सामना आणखी लक्षवेधी ठरला. भारताने यापूर्वी पहिल्या सामन्यात चीनचा 4-3 असा कडव्या लढतीत पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात जपानवर 3-2 असा विजय मिळवत भारताने आपली ताकद दाखवली होती. कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे गोलांचा धडाका लावला. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातच भारताने 7-0 अशी आघाडी घेतली होती. कझाकस्तानला काही संधी मिळाल्या, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
सुपर 4 मधील आव्हान –
सुपर 4 मध्ये भारतासह चीन, मलेशिया आणि कोरिया या चार संघांनी प्रवेश केला आहे. भारत आणि मलेशियाकडे प्रत्येकी 9 गुण, कोरियाकडे 6, तर चीनकडे 4 गुण आहेत. सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळेल. भारताला मलेशिया, कोरिया आणि चीनशी दोन हात करावे लागतील. यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.
हॅट्रिक नायक आणि गोलचा धडाका –
भारताच्या अभिषेकने 5व्या, 8व्या, 20व्या आणि 59व्या मिनिटाला चार गोल करत सामन्याला रंगत आणली. सुखजीत सिंहने 15व्या, 32व्या आणि 38व्या मिनिटाला, तर जुगराज सिंगने 24व्या, 31व्या आणि 47व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिक पूर्ण केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने 26व्या मिनिटाला एक गोल केला, तर अमित रोहिदास (29वे), राजिंदर सिंग (32वे), संजय सिंग (54वे) आणि दिलप्रीत सिंग (55वे) यांनीही गोल नोंदवले.
हेही वाचा – ‘रोहित-विराट सोबत…’, आशिया कपमधून बाहेर पडलेल्या खेळाडूने ‘BCCI’ शी घेतला पंगा, नेमकं काय म्हणाला?
पुढील आव्हान –
भारताच्या आक्रमक खेळाने कझाकस्तानला कुठेही संधी मिळाली नाही. आता सुपर 4 मधील सामने कठीण असले, तरी भारताचा आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे ते फायनलचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भारतीय संघाचा हा विजयी प्रवास पाहता चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.





