पुणे – पुण्यात वडगाव ब्रीजवर एका भरधाव मर्सिडिज कारने दुचाकीस्वारांना ठोकरले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कार चालक मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. दरम्यान अपघातग्रस्त कार पुलावरुन खाली पडल्याने चालकासह चौघे जखमी झाले आहे. इतर तिघांनीही मद्यपान केले होते. पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा एकदा बड्या बापाच्या मुलाने केलेल्या अपघाताने पुणे शहरत हादरले आहे. कुणाल मनोज हुशार (२३,रा.चिंचवड) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा साथीदार प्रज्योत दिपक पुजारी (२३,रा.चिंचवड) हाही घटनेत जखमी झाला आहे. कार चालक शुभम राजेंद्र भोसले (२३,रा.निगडी प्राधिकरण) याला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या सोबत कारमध्ये निखील मिलींद रानवडे (२६,रा.औंध गाव), श्रेयस रामकृष्ण सोळंखी( २५,रा.चिंचवड) आणि वेदांत इंद्रसिंग रजपूत (२८,रा.निगडी) हे तिघेही कारमध्ये होते. ते अपघातात जखमी झाले आहेत. आरोपी आणि त्याचे मित्र हे पोस्ट ग्रॅज्युएशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही कार(एमएच ०१ बीके ४६२५) आरोपी शुभमच्या आईच्या नावाने आहे. शुभम शुक्रवारी रात्री कार घेऊन घरातून बाहेर पडला. त्याने सोबत निखील, श्रेयस आणि वेदांत यांना घेतले. हे चौघेही हिंजवडी येथे एका ढाब्यावर जेवण करायला गेले. तेथे जेवणाबरोबर मद्यपान केल्यावर लॉंग ड्राईव्हला जायचे ठरले. यानंतर शुभमने गाडी खेड शिवापुरला नेली. तेथून ते परतत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास वडगाव ब्रीजवर समोरील दुचाकीला धडकले. यानंतर कार पलटीखात पुलावरुन खाली पडली. मात्र गाडीची एअर बॅग उघडल्याने चौघेही बालंबाल बचावले. अपघातात मात्र दुचाकीवरील कुणाल आणि प्रज्योत गंभीर जखमी झाले. यात कुणालचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. शंकर महाराज मठात किर्तनाला आले आणि … अपघातातील मृत कुणाल आणि प्रज्योत हे बीएस्सी कॉम्पुटरचे शिक्षण घेतात. ते दोघेही चिंचवडवरुन शंकर महाराज मठात किर्तनासाठी आले होते. किर्तनाचा कार्यक्रम उरकून ते घरी परतत असताना हा अपघात झाला.