पुणे | कोणत्या मतदारसंघात बदलणार इतिहास

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याबरोबरच पुणेकरांचा यंदाच्या विधानसभेत कल नेमका कसा राहणार आणि कोणत्या मतदारसंघात इतिहास घडणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शहरात २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आठ मतदारसंघ तयार झाले आहेत. त्यानंतर या सर्वच मतदारसंघांत मागील तीन निवडणुकांमध्ये उमेदवारीचा इतिहास रंजक राहिला आहे.
शहरात आतापर्यंत केवळ दिवंगत खासदार गिरीश बापट हे १९९५ पासून ते २०१९ पर्यंत पाच वेळा आमदार राहिले आहेत. पर्वती आणि खडकवासला हे दोन मतदारसंघ वगळता मागील तीन निवडणुकांमध्ये कोणताही आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही.
कोथरूड विधानसभा
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये कोथरूड मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार होते.
त्यानंतर २०१४ मध्ये भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला, तर २०१९ मध्ये भाजपने कुलकर्णी यांंचे तिकीट कापत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे तीनही वेळेस या मतदारसंघात आमदार बदलले असून, विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर जात इतिहास घडविणार की मतदारसंघ आमदार पुन्हा एकदा बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.
वडगावशेरी
वडगावशेरी मतदारसंघाची रचनाही २००९ मध्ये झाली. पहिल्या निवडणुकीत माजी आमदार बापू पठारे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला.
त्यामुळे तीनही वेळा या मतदारसंघात आमदार बदलले असून, सुनील टिंगरे दुसऱ्यांदा विजयी होत इतिहास घडविणार का मतदार आमदार बदलाची परंपरा कायम ठेवणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कसबा मतदारसंघ
कसबा मतदारसंघात १९९५ पासून ते २०१९ पर्यंत दिवंगत खासदार गिरीश बापट सलग पाच वेळा आमदार होते. त्यानंतर बापट खासदार झाल्याने या मतदारसंघात दिवंगत मुक्ता टिळक २०१९ मध्ये आमदार झाल्या.
मात्र, त्यांच्या अकाली निधनाने २०२२ मध्ये या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत कसब्यातील मतदारांनी आपला कल बदलून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना विजयी केले. त्यानंतर आता पुन्हा धंगेकरांना कसबावासीय कौल देणार, की उमेदवार बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ
विधानसभा फेररचनेत २००९ मध्ये या मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे निवडून गेले. त्यानंतर २०१४ मध्ये ही जागा माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जिंकली. २०१९ मध्ये भाजपने या मतदारसंघात उमेदवार बदलून सुनील कांबळे यांना संधी दिली.
त्यामुळे मागील तीनही निवडणुकीत या मतदारसंघात आमदार बदलाची परंपरा काम असल्याने सुनील कांबळे यांच्यापुढे जागा टिकविण्याचे आव्हान असणार आहे.
पर्वती मतदारसंघ
या मतदारसंघात २००९ पासून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी सलग तीन वेळा विजय मिळविला असून, चौथ्या विजयासाठी त्या सज्ज आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला चांगले मताधिक्य मिळाले असल्याने मिसाळ विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असल्या,
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिसाळांना चौथ्यांदा आमदार करत इतिहास घडविणार का, याची उत्सुकता आहे.
शिवाजीनगर मतदारसंघ
या मतदारसंघातही मागील तीन निवडणुकांमध्ये मतदारांनी आमदार बदलेला आहे. २००९ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे दिवंगत आमदार विनायक निम्हण निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे विजय काळे विजयी झाले,
तर २०१९ मध्ये भाजपने उमेदवार बदलल्याने सिद्धार्थ शिरोळेंना आमदारकी मिळाली. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा ते आपली आमदारकी टिकविणार, की मतदार बदलाला साथ देणार याबाबत राजकीय अडाखे बांधले जात आहेत.
खडकवासला मतदारसंघ
या मतदारसंघात २००९ मध्ये मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे निवडून आले. त्याच्या अकाली निधनानंतर २०११ मध्ये भाजपचे भीमराव तापकीर आमदार झाले.
त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये तापकीर यांनी निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक साधली असून, २०२४ मध्ये विजयाचा चौकार मारण्यासाठी ते सज्ज आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सलग चौथ्यांदा त्यांना विधानसभेत पाठवणार, की दुसराच पक्ष मुसंडी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
हडपसर मतदारसंघ
हडपसर मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर या मतदारसंघात आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले.
त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल पाहावयास मिळाला आहे. त्यामुळे तुपे दुसऱ्यांदा निवडून येत मतदारसंघात इतिहास घडविणार, की मतदारसंघ आमदार बदलाचा इतिहास कायम ठेवणार, याबाबत चर्चांना जोर आला आहे.





