पुणे | कोथरूडमध्ये भाजपात बंडखोरी?

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच महायुतीच्या जागा वाटपावरून पक्षातील आजी-माजी पदाधिकारी धुसफूस करीत असताना आता कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारस्ंघात कार्यक्रम घेत विधानसभेसाठी तयारी सुरू केली.
भाजपचे महापालिकेतील विरोधीपक्ष नेते उज्वल केसकर यांनीही एक कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा माझा मानस असल्याचे सांगत कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे,
खासदार व केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे. पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर कोथरूडमध्ये भाजपसाठी उज्वल केसकर हे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
याबाबत केसकर म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून पुणे आणि पुणे शहरातील अनेक निर्णय वादग्रस्त झाले आहेत. मी आणि अनेक सहकारी मित्रांनी यावर सनदशीर मार्गाने आवाज उठवला आहे. प्रत्येक वेळेस न्यायालयात जाऊन दाद मागणे हे लोकशाही परंपरेला शोभेचे नाही. लोकप्रतिनिधी नसतानाही आपण स्वत: अनेक प्रश्न मांडत आहोत.
त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या निधीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतात ही शोकांतिका आहे. याबाबत मी स्वत: प्रशासनाला धारेवर धरले. चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षानंतर कोथरूडच्या ट्रॅफिकच्या संदर्भात एक व्हाट्सअप नंबर जाहीर केला,
याबद्दल अभिनंदन केले. नागरिकांना लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवा, अशी आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे.
मी शहराच्या अनेक प्रश्नांसाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जनतेला लोकप्रतिनिधी हवा आहे. मी पक्षाकडे कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर मला माझे पर्याय खुले आहेत. – उज्वल केसकर, माजी विरोधीपक्ष नेते





